You are currently viewing केंद्रीय मंत्री असताना एअरपोर्ट च्या आवश्यक परवानग्या दिल्या

केंद्रीय मंत्री असताना एअरपोर्ट च्या आवश्यक परवानग्या दिल्या

मात्र तरीही खासदार सुरेश प्रभू चिपी विमानतळ उदघाटनाबाबत अनभिज्ञ

मालवण

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही आणि प्रत्येक गोष्ट राज्यसभा सदस्यांना कळवण्याची गरज नाही, अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केली. आपण केंद्रीय मंत्री असताना विमानतळासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या उपलब्ध करून दिल्या. परंतु स्थानिक पातळीवर काही कामे रखडल्यामुळे विमानतळाचे उद्घाटन रखडले होते, असे त्यांनी सांगितले.

विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला करण्यात होणार आहे. तसे भाजप शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र या विमानतळाचे उद्घाटन कधी होत आहे, याची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सुरेश प्रभू यांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण-मेढा येथे मूळ गावी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची आज भेट घेतली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, चिपी विमानतळाचे भूमिपूजन मी केंद्रीयमंत्री व नारायण राणे उद्योगमंत्री असताना झाले होते. त्यानंतरच्या काळात या विमानतळाचे काम रखडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा आपल्याकडे नागरी उड्डाण मंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पहिल्याच बैठकीत चिपी विमानतळाचा आढावा घेत यात ज्या परवानग्या आवश्यक होत्या त्या मिळवून दिल्या. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. हे विमानतळ राज्य सरकारचे असल्याने विमान टेकऑफ, लॅण्डींगसाठी ते योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच विमानाने आपण दिल्लीला गेलो. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन हे फीत कापून न होता उड्डाण करून झाले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून स्थानिक पातळीवर रस्ते, रनवे आदी कामे करायची होती. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनीही याच दिवशी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत श्री प्रभू यांना विचारले असता आपल्याला या विमानतळाच्या सद्य:स्थितीबाबत काही माहिती नाही. कोणी जाहीर केले असेल तर त्यानुसार होईल. त्यामुळे त्यावर मी अधिक टिपण्णी करणार नाही, असे स्पष्ट केले. यावर माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांना या विमानतळाच्या उद्घाटनाबाबत कल्पना नाही हे. कसे असू शकेल असे विचारले असता ते म्हणाले, सरकार एवढं मोठ आहे. उद्घाटनाची तारीख कोणीतरी ठरविली असेल. प्रत्येक गोष्ट राज्यसभा सदस्यांना कळविण्याची गरज नसते तशी पद्धत आपल्याकडे नाही, असे सांगत श्री. प्रभू यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा