भाजी मंडईत अतिक्रमण हटाव कोणाच्या भल्यासाठी?
सावंतवाडी नगरपालिका

भाजी मंडईत अतिक्रमण हटाव कोणाच्या भल्यासाठी?

“एवढ्या साठीच केला होता का अट्टाहास?” असं म्हणण्याची पाळी आली सावंतवाडीकरांवर…

सावंतवाडीवर कोरोनाचे संकट आले असताना भाजी मंडईत अतिक्रमण हटाव कोणाच्या भल्यासाठी?

सावंतवाडीत संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या जागी नगरपालिकेचे नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आणि त्यासाठीची तयारी झाली असल्याचे गेली चार पाच वर्षे ऐकू येत होते, परंतु त्यासाठीच्या निधीची तरतूद झाली नसल्याने मार्केटचे काम पुढे सरकत नव्हते. बबन साळगावकर नगराध्यक्ष असतानाच त्याबाबत घोषणा झाली होती. परंतु मध्यंतरी राजकारणाने घेतलेले वळण आणि त्यातून बबन साळगावकर यांनी दिलेला राजीनामा, शिवसेनेची सत्ता जाऊन भाजपाची आलेली सत्ता या सर्व घडामोडीत भाजपाच्या नगराध्यक्षांनी नगरपालिकेच्या सदरच्या जागेत बीओटी तत्वावर १०० कोटींचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची केलेली घोषणा आणि त्याच धर्तीवर भाजी मंडईतील अतिक्रमणे साफ करण्याची उघडलेली मोहीम म्हणजे *यासाठीच केला होता का अट्टाहास* असं म्हणण्याची पाळी भाजी मार्केटमध्ये हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य गोरगरीब भाजी, फळे विक्रेत्यांवर आली आहे.

सावंतवाडी नगरपालिकेत भाजपाचे शासन आल्यावर घेतले जाणारे निर्णय हे एककल्ली असल्याचे दिसून येते. गेल्या चार महिन्यात देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सावंतवाडीत मात्र कोरोनाचा धोका नव्हता परंतु गेले काही दिवस सावंतवाडीत दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर एकाच भागात कोरोनाचे आणखी काही रुग्ण भेटल्याने सावंतवाडी शहर असुरक्षित झाले आहे. सावंतवाडीत कोरोनाचा वाढता प्रभाव बघता सावंतवाडी नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी त्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे असताना भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना संत गाडगेबाबा भाजी मंडईतील अतिक्रमण हटवून मंडई परिसर खाली करण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. त्यामुळे कोविड-१९ पेक्षाही महत्वाचा विषय झालाय तो कोरोनाच्या संकटात कसेबसे दोन वेळच्या अन्नाची सोय करणारे गोरगरीब भाजी विक्रेते हटविणे.

एकीकडे सावंतवाडीचे नगराध्यक्ष खाजगी गुंतवणुकीतून १०० कोटींचे मार्केट उभारणार अशी घोषणा करतात तर दुसरीकडे सणासुदीच्या तोंडावर गावागावातून येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांना अतिक्रमणच्या नावावर उठवून लावले जात आहे म्हणजे ही सगळी उठाठेव नक्की कोणासाठी? कोरोनाच्या काळात गोरगरीब, मोलमजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे कार्यक्रम केले गेले, फोटो काढून पेपरमध्ये, सोशल मीडियावर झळकवले गेले आणि आता तेच नेते गोरगरिबांना दोन वेळच्या अन्नासाठी रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करण्यास अटकाव करतात, हा विरोधाभास का? कोरोनाच्या काळात अनेकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, लोक अन्नासाठी महाग झालेत तिथे गोरगरीब, भाजीवाले, व्यापाऱ्यांवर कारवाई करून नक्की काय साध्य करणार आहेत? परप्रांतीय लोकांना गाळे आणि स्थानिकांना व्यापार करण्यास अटकाव अशीच परिस्थिती आज सावंतवाडीकरांवर आलेली दिसत आहे.

सावंतवाडीत आजूबाजूच्या चार गावातील लोक भाजीपाला, फळे, कडधान्ये विक्रीसाठी बाजारात येतात. त्याच विक्रीतून सद्ध्याच्या कठीण परिस्थितीत जगण्याचा मार्ग शोधतात. भविष्यात येणारे सण, त्यासाठी घरात धान्य भरणे, पोराबाळांना कपडेलत्ते, शाळेची पुस्तके इत्यादी सर्व खरेदी करायची असते. परंतु गोरगरीब शेतकऱ्यांना कोरोनाच्या कठीण काळात उठवून लावून मार्केटची साफसफाई करण्यामागचा उद्देश मात्र अनाकलनीय आहे.

सावंतवाडीत गेली २३ वर्षे दीपक केसरकरांची एकहाती सत्ता होती. केसरकरांना मानणारा एक मोठा वर्ग सावंतवाडीत आहे. शहराला शांत आणि सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात बुद्धिजीवी लोक राहत असल्याने शहराला एक संस्कृती आहे. परंतु गेल्या काही महिन्यात सत्ता बदल झाल्यावर शहरात विकास कुठे दिसतच नाही, उलट एक वेगळीच संस्कृती उदयास येत असल्याची चाहूल लागते आहे. नितेश राणे यांनी पोटनिवडणुकीच्या अगोदर आपणांस उर्वरित ७२५ दिवस संधी द्या आपण विकास करून दाखवतो असे वचन दिले होते, परंतु गेल्या काही महिन्यात सावंतवाडीत रखडलेली विकास कामे आणि थांबलेला विकास पाहता ती निवडणुकीपुरतीच घोषणा होती की काय असा प्रश्न सावंतवाडीकरांना पडला आहे.

सावंतवाडीत आता खाजगी गुंतवणूकदारास १०० कोटींच्या मार्केटचे देण्यात येणारे काम पाहता नक्की सावंतवाडीत विकास होणार की नगरपालिकेची जागा खाजगी विकासकांच्या घशात जाणार असा प्रश्न उभा राहिला आहे. सावंतवाडी नगरपालिकेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधी नगरसेवकांची आणि गप्प असलेल्या शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे विरोधी नगरसेवक सुद्धा सदरच्या नगरपलिकेच्या जागेत होणाऱ्या खाजगी गुंतवणुकीस राजी आहेत का हे गौडबंगाल न समजण्यासारखे आहे. नगरसेविका लोबो मॅडमनी आळवलेला विरोधाचा सूर अचानक गप्प कसा काय झाला हे सुद्धा गुपितच आहे. त्यामुळे “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशीच काहीशी परिस्थिती सावंतवाडी नगरपालिकेत दिसून येत आहे. नगरपालिकेच्या जागेत खाजगी गुंतवणुकीतून मार्केट उभारण्याची घोषणा होऊन देखील सावंतवाडीचे शिल्पकार आमदार दीपक केसरकर सुद्धा गप्प कसे काय? हे मात्र अजूनही अल्लाउद्दीनच्या चिरागात लपलेल्या जीन सारखे न दिसणारे, न समजणारे गुपित बनले आहे.

सावंतवाडीत एकीकडे वाढत असलेला कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे १०० कोटींच्या खाजगी गुंतवणुकीतून होणाऱ्या मार्केटच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील राजाने स्वार्थापोटी कोरोनावर दुर्लक्षरूपी मात केल्याचे दिसून येत आहे. परंतु अल्लाउद्दीनच्या चिरागात नक्की काय गुपित लपलंय ते मात्र गुपितच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा