You are currently viewing कार्यकर्त्याने अभ्यासुनी प्रकटावे – डॉ.विजय लाड

कार्यकर्त्याने अभ्यासुनी प्रकटावे – डॉ.विजय लाड

वैभववाडी

कोणतीही चळवळ कार्यकर्त्यांवर उभी असते.चळवळीचा केंद्रबिंदू कार्यकर्ताच असतो. समाजामध्ये ग्राहक चळवळीचे काम करीत असताना कार्यकर्त्याने अभ्यासूनी प्रकटावे असे मत डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र,कोकण विभागाने कोकण विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संस्था व संस्थेच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्री ठीक आठ वाजता गुगल मिट ॲपवर ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना डॉ.विजय लाड यांनी मार्गदर्शन केले. देव केवळ देवळात नाही तर तो दीन, दुबळ्या, अशिक्षित अडलेल्या-नडलेल्या, गरजू व्यक्तींच्या रूपाने पाहायला मिळतो. अशा व्यक्तींना केलेली मदत हीच खरी ईश्वर सेवा आहे. ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी अशा लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे असे डॉ.विजय लाड यांनी सांगितले.


१९७२ मध्ये ग्राहक चळवळ सुरू झाली तरी १९७४ मध्ये ग्राहक पंचायतीची स्थापना झाली. ग्राहक पंचायतीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रयत्नातून १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. महाराष्ट्रामध्ये ग्राहक चळवळ तळागाळापर्यंत पोचावी यासाठी २०१० मध्ये ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संस्थेची स्थापना झाली. या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राहक जागृतीचे कार्य सुरू आहे. तसेच ग्राहक चळवळ, चळवळीची त्रिसूत्री, ग्राहक चळवळीचे तत्वज्ञान, ग्राहक चळवळीचा धर्म, ग्राहक चळवळीचे पंचप्राण आणि संस्थेची विविध प्रकारची मान्यता याबाबत राज्य सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी सविस्तर माहिती दिली.
ज्याप्रमाणे संसाररुपी गाडी पती-पत्नी या दोन चाकांवर चालत असते. त्याचप्रमाणे ग्राहक चळवळीमध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांनी ग्राहक चळवळमध्ये सुद्धा सक्रिय सहभागी झाले पाहिजे. बऱ्याच अंशी खरेदी महिला करीत असतात. त्यामुळे महिला ग्राहक चळवळीमध्ये आल्यास त्यांचे प्रबोधन होऊन फसवणुकीला आळा बसण्यास मदत होईल असे राज्य संघटिका सौ. मेधाताई कुलकर्णी यांनी सांगितले.
या ऑनलाईन बैठकीला राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव श्री.अरुण वाघमारे, संघटक श्री.सर्जेराव जाधव व सहसंघटिका सौ.मेधाताई कुलकर्णी तसेच कोकण विभागातील प्रा.श्री.एस.एन.पाटील,श्री.एकनाथ गावडे, श्री. सीताराम उर्फ दादा कुडतरकर,संदेश तुळसणकर, दिनेश बेरीशेट्टी, वैशाली रोगे, गौतम गायकवाड, नवीनकुमार पांचाळ, अनंत नाईक, सुमित जाधव, दर्शना राणे, स्मिता कवडे, शर्मिला परब विलास घाडीगावकर, प्रणिता वैराळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा