You are currently viewing अतिवृष्टीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी

अतिवृष्टीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी

निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

सिंधुदुर्गनगरी

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. 6 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2021 रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.

            सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी व त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन संबंधितांकडून करून घ्यावे. शोध व बचावाची सामग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. सर्व विभाग, कार्यालय प्रमुखांनी आपापल्या मुख्यालयात हजर रहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये. आपल्या अधिनस्थ यंत्रणेला देखील तसे आदेश देण्यात यावेत. बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित बाजुला करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजनची वाहतूक करणारे मार्ग अखंडितपणे सुरू राहतील यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. बंदर विभागाने अतिवृष्टीच्या कालावधीतील भरती – ओहोटीच्या तारखा जिल्हा व तालुका प्रशासनास उपलब्ध करून द्याव्यात. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी व डीसीएचच्या ठिकाणी पावसाचे पाणी जावून रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिक्षक अभियंता, महावितरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अतिवृष्टीच्या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच या ठिकाणी अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहील यासाठी नियोजन करावे. तसेच कोविड केंद्रांसाठी जनरेटर उपलब्ध करून ठावेवेत. महसूल व पोलीस विभाग यांनी आपल्या ताब्यातील बोटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला – 02362-228847 या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा