You are currently viewing भावपूर्ण श्रद्धांजली! दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण…

भावपूर्ण श्रद्धांजली! दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण…

दिल्ली :

देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर सातारामधील पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना बुधवारी भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. दुसाळे गावातील सचिन संभाजी जाधव यांना भारत-चीन सीमेवरील लेह लडाख भागात वीरमरण आले.

शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद सचिन जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा दिल्लीतून पुण्याला पोहोचले. तिथून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दुसाळेला पोहोचेल आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारत-चीन यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात हे जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तारळे येते पार्थिव पोहोचल्यानंतर तिथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसाळे गावापर्यंत त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून घेऊन गेले. गावागावात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर फुलांचा सडा टाकला.

शहीद जवान सचिन जाधव हे तीन महिन्यांपूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. मात्र भारत चीन तणाव वाढत असल्यामुळे त्यांची एक महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच येऊन गेलेल्या सचिन यांच्या अशा जाण्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सचिन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या शौर्याला वंदन करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! वाहिली आहे. जाधव कुटुंबीय आणि दुसाळे ग्रामस्थांच्या दुःखात महाराष्ट्रासह संपूर्ण देश सहभागी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा