महावितरण कार्यालयात भाजपची धडक…
मालवण
शहरासह परिसरात गेले काही दिवस महावितरणकडून वीज बिले वसुलीचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. यात वीज समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वीज बिल वसुली तत्काळ थांबवून येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वीज समस्या, ग्राहकांच्या तक्रारी, पथदिव्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शहर भाजपच्यावतीने माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिला.
वीज पुरवठ्याच्या समस्येसह वीज बिल वसुलीच्या मोहिमेविरोधात आज शहर भाजपच्या पदाधिकार्यांनी आक्रमक भूमिका घेत देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक जगदीश गावकर, आप्पा लुडबे, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, आबा हडकर, महेश सारंग, पंकज पेडणेकर, राजू कडू, श्री. मुणगेकर, विनय पारकर, सदा चुरी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तोक्ते वादळानंतर अनेक वीज समस्या आजही कायम आहेत. कमी दाबाचा वीज पुरवठा ही मोठी समस्या आहे. वीज खांबावर कंडक्टर न बदलल्याने पथदिव्यांची समस्याही गंभीर बनली आहे. याकडे प्राधान्याने लक्ष द्या अशी भूमिका नगरसेवक दीपक पाटकर यांनी यावेळी मांडली.