You are currently viewing आयुष्यात कष्टाशिवाय यश नाही

आयुष्यात कष्टाशिवाय यश नाही

*आयुष्यात कष्टाशिवाय यश नाही*

लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके; एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

पुणे

भारत हा खऱ्या अर्थाने विविधतेत एकता असणारा देश आहे. ही विविधता भाषा, धर्म, संस्कृती, वयोमान या सर्व पैलूंवर फूलत जाते. सार्वभौम भारताच्या सध्याच्या प्रगतीत युवकांचे योगदान खूप मोठे आहे, व या युवकांना मला सांगायचे आहे की, भारताला विकसित करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत व कायम लक्षात ठेवा आयुष्यात कष्टाशिवाय यश मिळत नाही, असा सल्ला मत लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके यांनी दिला. ते एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग येथे ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, डॉ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्‍वराजबागेतील मॅनेट इमारतीच्या प्रांगणात यंदाचा प्राजसत्ताकदिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके यांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून प्रसंगी उपस्थिती सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.सुराज भोयार यांनी आगीच्या चित्तथरारक कसरती दाखवत सर्वांचे लक्ष वेधले.
याप्रसंगी बोलताना, प्रा.डॉ. कराड म्हणाले, आजचा हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यविरांची आठवण काढण्याचा, त्यांना नमन करण्याचा आहे. गतवर्ष भारतीय लोकशाहीसाठी उल्लेखनिय ठरले व अनेक आघाड्यांवर भारताने प्रगती केली आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या प्रभू श्रीरांमांच्या अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने जगाचे लक्ष वेधले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा