You are currently viewing स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये सातत्य महत्वाचे – वैभव साबळे

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये सातत्य महत्वाचे – वैभव साबळे

सिंधुदुर्गनगरी

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्यामध्ये सातत्य राखणे महत्वाचे असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज स्पर्धा परीक्षांविषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे आणि कुडाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रेरणा अंतर्गत जिल्हा प्रसासनाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईल याबाबत या सत्राची प्रस्तावना करताना माहिती दिली.

              स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीच्या दृष्टीने इंग्रजी संभाषणाचा सराव करणे फायद्याचे असल्याचे सांगून श्री. साबळे म्हणाले, पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच असे नाही. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नये. दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात यश मिळेल. त्यासाठी सातत्याने अभ्यास करणे व प्रयत्नांमध्ये कमतरता न पडू देणे महत्वाचे. तसेच फक्त  स्पर्धा परीक्षांकडेच लक्ष न देता एखादा दुसरा पर्यायही सोबत ठेवणे हे करियरच्या दृष्टीने महत्वाचे आहे. योग्य वेळी योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे. सर्व विषयांचा अभ्यासही तितकाच महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

              श्री. गाढवे म्हणाले, सुरुवातीस विषयांची मांडणी आणि संकल्पना समजण्यासाठी शालेय पुस्तके व एनसीईआरटीची 4 थी ते 12 वीची पुस्तके यांचा अभ्यास करावा. शासकीय सेवेतही स्पर्धा परीक्षा देता येतात. कोचिंग क्लास हे फक्त दिशादर्शक असतात. आपण केलेल्या अभ्यासावरच परीक्षा द्यायची असते. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन महत्वाचे आहे. शेवटच्या एक महिन्यात जास्तीत जास्त उजळणी करण्यावर भर द्यावा. पदवीचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना दोन्हीमध्ये समतोल महत्वाचा आहे.

            यावेळी एमपीएससीच्या परीक्षांचे स्वरुप, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, पुस्तकांची निवड, अभ्यास पद्धती यासोबतच एसटीआय परीक्षांविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + seventeen =