You are currently viewing चतुर्थी काळात परप्रांतीय विक्रेत्यांना सावंतवाडीत शहरात “नो एंट्री” – नियोजन समिती सभेत निर्णय

चतुर्थी काळात परप्रांतीय विक्रेत्यांना सावंतवाडीत शहरात “नो एंट्री” – नियोजन समिती सभेत निर्णय

सावंतवाडी

गणेश चतुर्थी काळात शहरात आठवडा बाजार वगळता परप्रांतीय विक्रेत्यांवर बंदी, तर तालुक्यातील स्थानिकांना सूट देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या चतुर्थी नियोजन समिती सभेत घेण्यात आला. दरम्यान यावेळी शहरात वीज पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी प्रयत्न करा, तसेच अपघात होऊ नये, यासाठी एसटी शहराबाहेरून मार्गस्थ करा, अशा सूचना नगराध्यक्ष संजू परब यांनी दिल्या. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज येथे नगराध्यक्ष परब यांच्या नेतृत्वाखाली नियोजनाची बैठक घेण्यात आली.

यावेळी मास्क न घालणाऱ्या विक्रेत्यांवर व नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सुधीर पराडकर यांनी केली. त्याची गंभीर दखल नगराध्यक्ष परब यांनी घेऊन त्या सुचने प्रमाणे कारवाई करा,अशा सूचना प्रशासनाला दिल्या. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवा, काही ठिकाणी एकेरी मार्ग करा, तसेच कोणतेही अपघात होऊ नये यासाठी ठिक-ठिकाणी बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी,सुरेंद्र बांदेकर, दीपाली भालेकर, सुधीर आडीवरेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, डॉ.उत्तम पाटील, महावितरणचे अधिकारी श्री भुरे, वाहतूक पोलीस प्रवीण सापळे,सावंतवाडी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे, तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष, व्यापारी संघटना अध्यक्ष, रिक्षा संघटना अध्यक्ष आदी उपस्थित होते.

गणेश चतुर्थीच्या काळात शहरात नाक्यानाक्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, प्रत्येक ठिकाणी पोलिसांची नेमणूक करावी, अशी सूचना श्री परब यांनी यावेळी दिली. तसेच ८ सप्टेंबर पासून पुढील १३ दिवस बाजारपेठेतून एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आज नगराध्यक्ष श्री परब यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक पार पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा