राजकीय नेतेच अवैध व्यवसायांचे उगम
विशेष संपादकीय….
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्राला म्हणजेच खासदार नारायण राणे यांना केंद्रीय उद्योगमंत्री पद मिळाले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्याचा जल्लोष देखील साजरा करण्यात आला. जागोजागी नारायण राणेंच्या समर्थकांनी आपल्या लाडक्या नेत्यांचे स्वागत केले. भारावलेल्या नारायण राणेंनी देखील आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानताना आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा उपयोग करून आपल्या खात्यातून सूक्ष्म, लघु, मध्यम अशा विभागातून करोडो रुपये जिल्ह्यातील उद्योजकांना देण्याचे आश्वासन दिले आणि जिल्ह्यात उद्योजक निर्माण करणार असे जाहीर केले. कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून दादांच्या घोषणेचे स्वागत केले. परंतु इथे खरा प्रश्न उभा राहतो तो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते तरी मंत्र्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जरूपी पैशातून जनहिताचे उद्योग करतील काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जर जोरदार कुठले उद्योग चालत असतील, सुरू असतील तर ते म्हणजे गोव्याची अवैध दारू तस्करी/विक्री, मटका, जुगार, क्लब, गांजा विक्री, व्हिडीओ गेम पार्लर, झटपट लॉटरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या उद्योगांमध्ये नवनवीन चेहरे येतात, तरुणाई झटपट मिळणाऱ्या पैशांसाठी व्यसनांच्या आहारी जाते, त्यातून या उद्योगांना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळतात. बेरोजगार असणारे तरुण दारू, गांजा विक्रीच्या रॅकेटमध्ये सामील होतात. स्वतःही नशेच्या आहारी जातात आणि दारू, गांजा विक्रीचे नको ते उद्योग माथी मारून घेत समाजात गुन्हेगार म्हणून वावरतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या या अवैध, अनैतिक व्यवसायांचे उगम आणि जनक पाहिले तर राजकीय लोकच आहेत. आपला अवैद्य व्यवसाय सुरक्षित सुरू राहण्यासाठीच हे अवैध व्यवसाय करणारे राजकारणी लोक एखाद्या सत्तेतील अथवा तगड्या पक्षाचे पद अगदी विकतच घेतात. त्यामुळे पोलीस असो वा प्रशासकीय इतर यंत्रणांकडून राजकारणी व्यक्तीच्या अवैध व्यवसायावर कानाडोळा केला जातो आणि तिथेच तर कार्यकर्ते, तरुण युवक बरबादीच्या मार्गावर आणले जातात.
राज्य आणि केंद्र स्तरावरील राजकीय नेते आपल्या सभांना, स्वागताला होणारी गर्दी पाहून खुश होतात, भारावून जातात. परंतु भर पावसात, अगदी मध्यरात्री ही गर्दी कोणी आणली? कशी जमवली असेल? एवढी गर्दी जमविणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांचा व्यवसाय काय असेल? याचा साधा विचार देखील ते करत नसतात, कारण उच्चपातळीवर त्यांना ती गर्दी दाखवून वरिष्ठांना खुश करायचं असतं. प्रत्येक नेता आपलं भलं पाहत असताना कार्यकर्ते,जनता मात्र याच नेत्यांसाठी रस्त्यावर येते, मार खाते आणि आपल्याच नेत्यांचे सुरू असलेले अवैध धंदे ग्राहक बनून वाढवते. व्यसनाधीन होऊन कायमचेच रस्त्यावर येतात. आज जिल्ह्यातील काही प्रमुख पक्षांचे मुख्य कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे दारू, मटका, जुगार, अशाच अवैध व्यवसायात कार्यरत आहेत. पक्ष वाढीसाठी लागणारा पैसा आणि त्याची कमी पूर्ण करण्यासाठी अशा अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पक्षात पदे दिली जातात, त्यामुळेच राजकारणाची पातळी ही रसातळाला गेली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यात उद्योजक निर्माण करण्याचे पाहिलेले स्वप्न तेव्हाच पूर्ण होणार जेव्हा राजकारणी नेते , पदाधिकारी अवैध, अनैतिक धंदे बंद करून युवकांना कष्टाचे, मेहनतीचे मार्ग दाखवतील, जिल्ह्यात चांगले उद्योग व्यवसाय सुरू करून बेरोजगार युवकांच्या हाताला काम देतील. जिल्ह्यात काजू कारखानदार देखील शेकडो लोकांना रोजगार देतात, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज सुद्धा लोकांच्या हाताला काम देतात, मग राजकीय लोकांनी अवैद्य व्यवसाय न करता आपल्याच नेत्यांच्या आशीर्वादाने करोडो रुपये उभे करून जिल्ह्यात दोन चार मोठ्या इंडस्ट्री उभ्या केल्या तर हजारो हातांना काम मिळेल. बेरोजगार तरुण, युवक अनैतिक मार्गाला न जाता रोजीरोटीसाठी काम करतील, जिल्ह्याचे राहणीमान सुधारेल. परंतु यासाठी गरज आहे ती निकृष्ट मानसिकतेतून राजकीय नेत्यांनी बाहेर पडून सकारात्मक विचार अंगी बाणवले पाहिजेत. तरच नारायण राणे यांनी जिल्ह्यात उद्योजक बनविण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल यात शंकाच नाही.