नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर केसरकर काय बोलणार?
केंद्रीयमंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी राणेंनी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले. आजपासून ते आपल्या होम ग्राउंड म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. सावंतवाडीत आज रात्री जनआशीर्वाद यात्रा दाखल होणार असून रात्री साडे दहा पर्यंत नारायण राणेंचे सावंतवाडीत आगमन झाले नव्हते.
सावंतवाडीत आज रात्री उशिरा होणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेत जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणाऱ्या सभेत नारायण राणे नक्की काय बोलणार याचे औत्सुक्य आहे. राणेंच्या यात्रेत शिवसेनेवर निशाणा साधला जात असल्याने माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी उद्या सकाळी ९.०० वाजता आपल्या निवासस्थानी इलेक्ट्रॉनिक मिडियासहित सर्वांना निमंत्रण देत भरगच्चपत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामुळे नारायण राणे आज सभेत काय बोलणार आणि त्यावर दीपक केसरकर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सावंतवाडीत केसरकर यांच्या निवसस्थानासमोर जिल्ह्यातील पोलीस कुमक सोबतच ठाणे, पालघर येथील पोलिसांचा ताफा तैनात ठेवण्यात आला असून नारायण राणे यांच्या सोबत जिल्ह्यात येणाऱ्या शेकडो गाड्यांचा ताफा केसरकर यांच्या श्रीधर निवासस्थाना समोरूनच जाणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. राणेंच्या यात्रेला सावंतवाडीत शिवसैनिकांकडून काहीही प्रतिकार अथवा आंदोलन वगैरे होण्याची चिन्हे नसून दीपक केसरकर निवासस्थानी आले असतानाही कोणीही शिवसैनिक श्रीधर निवासस्थानी आलेले नाहीत. नारायण राणेंच्या सावंतवाडीतील सभेत राणे केसरकर यांच्यावर नक्कीच भाष्य करतील यात शंकाच नाही. नारायण राणे यांची जिल्ह्यात असलेली एकहाती सत्ता माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनीच राणेंचा दहशतवाद लोकांच्या मनावर बिंबवून संपवली होती. नारायण राणेंना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कोणी पहिला शह दिला असेल तर तो केवळ दीपक केसरकर यांनीच. त्यानंतरच राणेंना विधानसभेच्या कुडाळ व बांद्रा येथील निवडणुकीत हार पत्करावी लागली होती तर त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांना दीड लाखांच्या मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे नारायण राणे आजच्या सभेत केसरकर यांच्यावर काय बोलतात यावरच केसरकर यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेचा रोख असणार हे निश्चित.