You are currently viewing भिंगरी…….

भिंगरी…….

मातीचे घरटे बनविणारा एक कलाकार

न्ह्यावेलीतील नाईक कुटुंबीयांनी केले संवर्धन

पक्षी म्हटल्यावर चोचीत काड्या घेऊन उंच झाडावर, घराच्या एखाद्या कोपऱ्यात, झुडपात तर काही माडांच्या झावळ्यांवर घरटे बनवितात. सुतार पक्षी तर आपल्या चोचीने झाडाच्या बुंध्याला भोक मारून आपल्या राहण्यासाठी निवारा बनवितो. काही पक्षी तर झाडांच्या ढोलींमध्येच घर बनवितात, परंतु भिंगरी हा छोटासा पक्षी आपले घरटे मात्र मातीचे बनवितो. आपल्या चोचीत चिखल माती धरून ती घराच्या छज्जा, स्लॅबवर अशाप्रकारे रचतो की पाहूनच आपल्याला आश्चर्य वाटतं. रेखीव पद्धतीने भिंगरी पक्षी आपले घरटे अगदी वर्षभर लागून बनवतो.
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातील सुधाकर नाईक यांच्या घराच्या व्हरांड्यात स्लॅबचा आधार घेत भिंगरी पक्षांच्या सहा ते सात जणांच्या थव्याने उत्कृष्ट असे मातीचे घर बनविले आहे. किलबिलाट करत या पक्षांचा थवा चोचीतून माती घेऊन ती विशिष्टप्रकारे घरट्यावर लावत असतो. आपल्या चोचीतून येणाऱ्या लाळेने त्याला भिजवून आकार देतो. मातीच्या घरात जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा म्हणून छिद्र (होल) ठेवतो. दिवसभर आकाशात उडणारे, भिरभिरणारे भिंगरी पक्षी रात्रीच्यावेळी आपल्या घरट्यात विसावतात. यांनी घरटे बांधायला घेतलं की पावसाळा सुरू होणार याची खात्री होते. पुढे येणाऱ्या थंडीच्या मोसमापासून बचावासाठी उबदार मातीची घरे ते तयार करत असावेत असे जाणकार सांगतात. न्हावेली येथील नाईक कुटुंबीयांनी या पक्षांच्या घरट्याचे संवर्धन करण्यासाठी आपल्या घराचे काम देखील पक्षांना त्रास होऊ नये म्हणून सावधपणे करत आहेत.
भिंगरी पक्षी जास्त वेळ आकाशात उडतच असतात. उडता उडता हवेतील कीटक, किडे आपल्या चोचीत पकडून ते खात असतात. त्यांच्या चोचीजवळ उलट आकाराचे केस असतात, त्यांचा वापर ते कीटक पकडून ठेवण्यासाठी करतात. तिचा रंग गडद निळा व डोके तपकिरी लाल रंगाचे असून पोटाचा भाग पांढराशुभ्र असतो. शेपटीला तारेसारखी दोन टोके असतात. हे पक्षी शक्यतो थव्यानेच आढळतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + eight =