You are currently viewing बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांचे निधन…

बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांचे निधन…

बांदा

बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी प्रतापराव उर्फ आबासाहेब राघोबा तोरसकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने मुंबई-माहीम येथे राहत्या घरी आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ.मिलिंद, मुलगी डॉ.मेघना, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपयुमो तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर यांचे ते काका होत.

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री निर्माण करणाऱ्या आबासाहेब यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतले होते.

येथील शैक्षणिक क्रांतित तोरसकर कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज यांच्या शिक्षणविषयक कल्पना आबासाहेब यांनी प्रत्यक्षात अमलात आणल्या होत्या. आपली बुद्धिमत्ता, कर्तृत्व, आणि शुद्ध चारित्र्य या गुणांनी त्यांनी शैक्षणिक व सामाजिक नेतृत्वाचा आदर्श समाजापुढे उभा केला होता. नावीन्यपूर्ण शिक्षण प्रणाली अमलात आणण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा असायचा.

त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील अत्युच्य योगदानाबद्दल आतापर्यंत शिक्षणमहर्षी, शिक्षणभूषण, पर्यावरणमित्र, शरदरत्न, समाजभूषण, कृषिमित्र, भास्कर अवॉर्ड आदी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांचे ते व्याही होत. तोरसकर हे जुने कट्टर काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, छगन भुजबळ यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.

सुरुवातीला त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी काही काळ मुंबई महापालिकेत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे काका माजी आमदार कै. डॉ. विठ्ठल तोरसकर व काकी कै. आशालता तोरसकर यांनी बांदा व परिसरातील शिक्षणप्रेमींना सोबत घेऊन सुरू केलेल्या बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक कार्यात त्यांनी तरुण वयात सुरुवात केली. शिक्षण मंडळाच्या अंतर्गत मुंबई-परेल, सावंतवाडी तालुक्यातील बांदा, मडुरा, डेगवे, असनिये व दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, भेडशी, पिकूळे, आई, कुडासे या शाळांच्या व कनिष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. इंग्रजी माध्यम ही काळाची गरज ओळखून त्यांनी बांद्यात व भेडशी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा