You are currently viewing देव होण्यापूर्वी

देव होण्यापूर्वी

जागतिक “सा क व्य” विकास मंचच्या सदस्या डॉ राणी खेडीकर यांची कविता

तो बसून माझ्या छातीवर
चालवत होता छन्नी
बारीक बारीक खपली
काढत होता बोटांनी
देव होण्यापूर्वी…

हृदयास माझ्या आकार देताना
किती छिद्र करत होता खिळ्यांनी
डोळ्यात भाव उतरवताना
बोथट किनार घासत होता दगडांनी
देव होण्यापूर्वी…

माझ्या हृदयावर डोकं ठेऊन
दमुन तो झोपून जाई
थेंब थेंब घामाचा अभिषेक होत राही
मी ही पडून असायचो,दगड होतो ना मी
देव होण्यापूर्वी…

त्याच्या डोळ्यात दगडाचे
बारीक बारीक कण टोचत होते
कसे वेचू त्याचे अश्रू
अजुन हात माझे घडले नव्हते
देव होण्यापूर्वी…

माझ्या एक एक अंगास आकार देऊन
तो त्याच्याच मनाने मला घडवत राही
आज मात्र देवळात येऊन
माझ्या पुढे हात जोडून
काय काय मागत राही….

डॉ राणी दुष्यंत खेडीकर
बालमानस तज्ञा
अध्यक्षा:बालरक्षक प्रतिष्ठान मुंबई
मोबाईल क्रमांक 9370143014

प्रतिक्रिया व्यक्त करा