आंबेलीतून लाखो रुपयांचे पाईप चोरीस : ठेकेदारांची तक्रार
तालुक्यात मोठ्या प्रमाणात विवीध विकास कामासाठी पाईप लाईन ठीक ठिकाणी टाकण्यात आली आहे अशा प्रकारे मौजे आंबेली येथे ४ लाख ४ हजार ६९३ रु. किमतीचे पी.व्ही.सी. पाईप अज्ञाताने चोरून नेले आहेत. या घटनेची ठेकेदार प्रथमेश प्रसाद कुलकर्णी (३१ वर्षे), रा. पाचगाव, कोल्हापूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी दिली.
आंबेली येथील तिलारी जलसंपदा प्रकल्पाच्या शेडजवळ एप्रिल ते जुलै महिन्यात पी.व्ही.सी. पाईप तारेच्या कुंपनात ठेवले होते. आंबेली येथील पाटबंधारे विभागाच्या शेडजवळ ठेवले होते. त्यानंतर ठेकेदार प्रथमेश कुलकर्णी यांनी हे पी.व्ही.सी. पाईप पाहिले असता ते कमी असल्याचे कुलकर्णी यांच्या निदर्शनात आले.
प्रत्येकी २८१० रु. चे ६३ पी.व्ही.सी. पाईप (१६० मिमी) एकूण किंमत १ लाख ७७ हजार, प्रत्येकी १३४४ रु. चे १२२ पी.व्ही.सी. पाईप(११० मिमी) किंमत १ लाख ६३ हजार ९६८, प्रत्येकी ८१४ रु. चे १५ पी.व्ही.सी. पाईप (९० मिमी) किंमत १२ हजार २१०, प्रत्येकी ५९० रु. चे ४३ पी.व्ही.सी. पाईप (७५ मिमी) किंमत २५ हजार ३७०, ४१५ रु. चे ६३ पी.व्ही.सी. पाईप (६३ मिमी) किंमत २६ हजार १४५ असा एकूण ४ लाख ४ हजार ६९३ रु. किंमतीचे पाईप चोरीस गेल्याची तक्रार प्रथमेश कुलकर्णी यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.याबाबत स्थनिकात उलटसुलट चर्चा सुरू आहे