You are currently viewing मालवण शाखेचा “शाळाभेट संपर्क अभियान”

मालवण शाखेचा “शाळाभेट संपर्क अभियान”

कथामाला ही बिनभिंतीची! बिन घंटीची शाळा!  – सुरेश ठाकूर, अध्यक्ष – साने गुरुजी कथामाला मालवण.

 

मालवण (मसुरे :

‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला ही बिनभिंतीची आणि बिन घंटी ची शाळा आहे,’ असा कथामालेचा गौरव ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रजांपासून ज्येष्ठ साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंपर्यंत अनेक जणांनी केलेला आहे. “ती कथामाला भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गावागावात, घराघरात पोहोचली पाहिजे. तिच खरी कथामाला संस्थापक प्रकाश भाई मोहाडीकरांना खरी श्राद्धांजली ठरेल,” असे उद्गार सुरेश ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांनी कथामाला संपर्क यात्रा मसुरे- मालवण प्रभाग येथील दौऱ्यात काढले.

साने गुरुजी कथामाला, मालवण या संस्थेच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संगमावर मालवण शाखेने *शाळाभेट संपर्क अभियान* राबवले आहे. मालवण शाखेतील जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचून त्यांना कथेचे अभ्यासक्रमातील महत्त्व, कथांचे प्रकार आदी समजावून देणे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकता, एकात्मता, बंधुता, देशप्रेम, राष्ट्रप्रेम आदी मूल्ये कथामालेच्या माध्यमातून कशी रुजवता येतात, याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन शाळेत जाऊन करण्यात येते.

मसुरे प्रभाग कथामाला संपर्क अभियानात त्यांचे सोबत सदानंद मनोहर कांबळी, सल्लागार समिती सदस्य, कथामाला, गुरुनाथ ताम्हणकर- संपर्कप्रमुख मसुरे प्रभाग हे सहभागी झाले होते. या संपर्क अभियानात यावेळी केंद्र शाळा मसुरे नं.1, प्राथमिक शाळा मसुरे कावा, प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा, प्राथमिक शाळा वेरली, प्राथमिक शाळा मसुरे भोगलेवाडी या शाळेत जाऊन बालक, पालक आणि शिक्षक वर्गाशी कथा, गाणी, गोष्टी यांच्यामार्फत संपर्क साधला. शाळेतील मुलांनी कथाकथन, गीतगायन, पोवाडा गायन केले.

या संपर्क यात्रेत सौ. शर्वरी सावंत, श्री. विनोद सातार्डेकर, श्री. गोपाळ गावडे, सौ. रामेश्वरी मगर, (सर्व शिक्षक मसुरे नं. 1), सौ. सुखदा मेहेंदळे, श्री. सुहास गावकर (मसुरे कावा), श्री. प्रशांत पारकर, श्री. सचिन डोळस, सौ. स्वाती कोपरकर, कविता सापळे (मसुरे देऊळवाडा), सौ. शुभदा रेडकर, श्री. राजेंद्र धारपवार, श्री. उदय कदम, सौ. पूर्वा केळूसकर (वेरली) सौ. श्रद्धा वाळके, सौ. अक्षता कोरगावकर (मसुरे भोगलेवाडी) आदी शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, लक्ष्मी पेडणेकर, मयुरी शिंगरे, जोती पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा