You are currently viewing जन आशिर्वाद यात्रेसाठी नारायण राणे मुंबईत होणार दाखल

जन आशिर्वाद यात्रेसाठी नारायण राणे मुंबईत होणार दाखल

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा  सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागणार आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांना आम्ही स्मृती स्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतलीय. तर स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार असल्याचा निर्धार राणेंनी केलाय.

अगदी थोड्याच वेळ्यात नारायण राणे यांचं 10 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन घालतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे.

मुंबईच्या अनेक भागांतून राणेंची जनआशीर्वाद यात्रा जाणार आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे जनतेशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान महाविकास आघाडी सरकारवर काय हल्लाबोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा राहिली आहे. आता खुद्द राणे शिवसेनेच्या अंगणात येत आहेत. आज राणे शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर कोणत्या शब्दात हल्लाबोल करणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा