‘मोस्टलीसेन’या नावाने लोकप्रियता प्राप्त झालेली यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी तिच्या कामासाठी नेहमीच चर्चेत असते. आजवर प्राजक्ताने भारताचे बऱ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे. प्राजक्ताला आजवर अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र आता प्राजक्ताचे नाव गुगलच्या चॅरिटेबल युनिटशी जोडले गेले आहे. गुगल ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा ती आपल्याला भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
‘इम्पॅक्ट चॅलेंज’ च्या माध्यमातून महिला आणि मुलींना भेडसावणाऱ्या आर्थिक विषमतेचे निराकरण करण्यासाठी गुगल ऑर्ग २५ दशलक्ष डॉलर्सचे अनुदान देणार आहे. प्राजक्ता बरोबरच इतर विविध क्षेत्रातील २९ महिलांचा या पॅनलमध्ये समावेश आहे. यात शकिरा, लोकप्रिय कवियत्री अमांडा गोरमन, नाओमी ओसाका आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या रिगोबर्टा मेंचू तुम यांचा देखील समावेश आहे.
प्राजक्ताने या उपक्रमा बद्दल बोलताना एका मुलाखतीत सांगितले की, “गुगल नेहमीच माझ्या सारख्यांना प्रोत्साहन देत आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरात महिला आणि मुलींसाठी समानता आणि समृद्धीचा मार्ग निर्माण होणार आहे. आणि मी गुगलची आभारी की त्यांनी माझी निवड केली आहे.” ‘इम्पॅक्ट चॅलेंज’च्या माध्यमातून गुगल धर्मादाय संस्थांना त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत करेल. प्राजक्ता आणि इतर पॅनलिस्ट या उपक्रमामधील अर्जदारांचा पाठपुरावा करतील, आणि गुगल संस्थेला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. मागील वर्षी गुगलने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदल यासारख्या विषयांचा समावेश केला होता.
‘इम्पॅक्ट चॅलेंज’द्वारे प्रत्येक निवडलेल्या संस्थेला ३००,००० डॉलर ते २ दशलक्ष डॉलर निधी, तसेच गुगलकडून मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ प्राप्त होईल. निवडलेल्या संस्थांच्या नावाची घोषणा २०२१ च्या अखेरीस केली जाईल. प्राजक्ताचे नाव या परीक्षकांच्या पॅनलमध्ये सामील होणे ही भरतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्राजक्ताच्या वर्क फ्रन्ट बद्दल बोलायचे झाले तर ती सध्या ‘मिसमॅच’च्या दुसऱ्या सिझनसाठी शूटिंग करत आहे. यात तिच्या बरोबर लोकप्रिय अभिनेता रोहित सराफ प्रमुख भूमिकेत दिसेल.