You are currently viewing अरुणा प्रकल्पाबाबत संबंधितांची येत्या दोन आठवड्यात बैठक घेऊन प्रश्न निकाली काढू – पालकमंत्री उदय सामंत

अरुणा प्रकल्पाबाबत संबंधितांची येत्या दोन आठवड्यात बैठक घेऊन प्रश्न निकाली काढू – पालकमंत्री उदय सामंत

वैभववाडी

तब्बल तीन वर्षे अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीर घळभरणी करून धरणात पाणी साठा केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे १३० घरे धरणात बुडाली आहेत.याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी ‘स्वातंत्र्यदिनी’ आक्रोश आंदोलन आयोजित केले होते.दरम्यान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आक्रमक असलेल्या प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली.यावेळी अरुणा प्रकल्पावर संबंधित अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची येत्या दोन आठवड्यात बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढू असे ठोस आश्वासन दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, संदेश पारकर, अतुल रावराणे तसेच लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

रविवारी पहाटे ३. वाजता प्रकल्पग्रस्त आंदोलनस्थळी रवाना झाले. सकाळी ६. वाजता प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले. त्यानंतर अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो… प्रकल्पग्रस्तात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे… तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा… जलसंपदाचे हर्षद यादव आणि आग लावे यांच्या कारभाराची चौकशी झालीच पाहिजे… कोण म्हणतो देणार नाही… घेतल्याशिवाय जाणार नाही… अशा गगनभेदी घोषणा देत प्रकल्पग्रस्तांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची अवहेलना करणाऱ्या कार्यकारी अधिकारी हर्षद यादव यांच्या पत्राची होळी करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत अरुणा प्रकल्पग्रस्तांशी सहानुभूतीपूर्वक चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र प्रश्न सुटल्याशिवाय अरुणा प्रकल्पाचे यापुढे कोणतेही काम करु दिले जाणार नाही. असा निर्वाणीचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

यावेळी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा या संघटनेचे मार्गदर्शक माजी सरपंच सुरेश नागप, विजय भालेकर, धोंडू नागप, शांताराम नागप तसेच संघटनेचे पदाधिकारी तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, विलास कदम, राजू नागप, हिरालाल गुरव, अशोक नागप, संतोष कांबळे, अशोक सावंत, प्रसन्न नागप, राजाराम नागप, अक्षय नागप, श्रीकांत बांद्रे, विनोद नागप आदी शेकडो प्रकल्पग्रस्त आक्रोश आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा