कोव्हीड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा प्रमाणपत्र आवश्यक
– जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश
सिंधुदुर्ग
रविवार दि. १५ आॕगस्टपासून जिल्ह्यातील दुकाने, उपहारगृहे, माॕल्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहण्यास मुभा देण्यात येत असून काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक राहील, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.
उपहारगृहे – खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५०% क्षमतेने पुढील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.
उपहारगृह/बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधित मास्कचा वापर अनिवार्य राहील. या बाबतच्या स्पष्ट सूचना आस्थापनाने लावणे आवश्यक राहील.
आचारी, वाढपे, व्यवस्थापक, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लसीकरण आवश्यक राहील. त्याचबरोबर मास्कचा वापर अनिवार्य राहील.
वातानुकूलित उपहारगृह/बार असल्यास वायूविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक.
प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झाॕस्ट पंखा आवश्यक.
शारीरिक अंतराचे पालन करणारी आसन व्यवस्था आवश्यक.
निर्जंतुकीकरणाची तसेच सॕनिटायझरची व्यवस्था आवश्यक.
सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी रात्री ९ वाजेपर्यंत घ्यावी. मात्र, पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्यास मुभा.
दुकाने– सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहण्यास मुभा. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक.
शाॕपींग माॕल्स– सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहण्यास मुभा देण्यात येत असून काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचारी व प्रवेश करणाऱ्या नागरिकांचेही कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक. लसीकरण प्रमाणपत्र फोटो ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक.
जिम्नॕशियम, योगसेंटर, सलून-स्पा- वातानुकूलित, विनावातानुकूलित जिम्नॕशियम, योगसेंटर, सलून-स्पा ५०% क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा. संस्था वातानुकूलित असल्यास वायूविजनासाठी पंखा व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक.
इनडोअर स्पोर्टस्- खेळाडूंचे, तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांच्या कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक. हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायूविजन असणे आवश्यक. बॕडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॕश, पॕरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्यास मुभा.
कार्यालय/औद्योगिक/ सेवा विषयक आस्थापना- सर्व शासकीय/निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे.
ज्या खासगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, त्या पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा.
गर्दी टाळण्यासाठी आस्थापनांनी विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. ज्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना घरुन काम करणे शक्य आहे,अशांना तशी मुभा द्यावी. कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्यावेळी प्रवासा टाळणे शक्य होईल असे वेळेचे व्यवस्थापन करावे.
खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा. अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५% उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक.
सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्र किनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या विहित वेळेत सुरु राहतील.
विवाह सोहळे– खुल्या प्रांगणातील, लाॕनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आसन व्यवस्थेच्या ५०% क्षमतेने व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे संपूर्ण पालन होईल, या अटीवर मुभा.
खुल्या प्रांगण, लाॕनवरील विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५०% परंतु, जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
बंदिस्त मंगल कार्यालये, हाॕटेलमध्ये क्षमतेच्या ५०% परंतु, जास्तीत जास्त १०० व्यक्ती.
कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी व्हीडीओ रेकाँर्डींग करणे व आवश्यकतेनुसार संबंधित प्राधिकाऱ्याला उपलब्ध करुन देणे आवश्यक. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडनीय कारवाई तसेच परवाना रद्द करण्याची कार्यवाही.
मंगल कार्यालय, हाॕटेल, लाॕन, भोजन व्यवस्थापन, बँड पथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह संस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही लसीकरण आवश्यक.
सिनेमागृहे व मल्टीफ्लेक्स- सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिफ्लेक्स(स्वतंत्र तसेच माॕलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद.
धार्मिक स्थळे- पुढील आदेशापर्यंत बंद.
आंतरराज्य प्रवास- लसीकरण झालेल्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआर ची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक.
गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्रशासन तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार गर्दी/जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॕली मोर्चे यावर निर्बंध कायम.
मेडीकल आॕक्सीजनची उपलब्धता मर्यादित असल्याने, जर रुग्णसंख्या वाढल्यास व उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे टन किंवा त्यापेक्षा जास्त आॕक्सीजन लागत असल्यास तात्काळ लाॕकडाऊन घोषित करुन कठोर निर्बंध लागू होतील.
मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध इत्यादीचे पालन करणे अनिवार्य.
सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व माॕल मालक, व्यवस्थापनांने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत यादी तयार ठेवावी.
दुकाने, उपहारगृहे, बार, माॕल्स, कार्यालये, औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालिक निर्जंतुकीकरण व सॕनिटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधिताची असेल. कर्मचारी, ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड/काॕन्टॕक्टलेस थर्मामीटर याची व्यवस्था करावी. मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट जमा करण्याची व विहित कार्यपद्धतीने विल्हेवाटीसाठी देण्याची संबंधितांची जबाबदारी असेल.
वरील आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथ रोग अधिनियम आणि भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.