You are currently viewing पर्युषण लक्षण पर्व

पर्युषण लक्षण पर्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*पर्युषण लक्षण पर्व*

 

पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचे शमन करणे. काम, क्रोध, लोभ, वैमानस्य या विकारापासून दूर राहणे.

 

पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. भाद्रपद शुक्लपंचमीला या व्रताची सुरुवात होते. याला पर्वराज किंवा महापर्व असेही म्हटले जाते. इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट— सप्टेंबर या काळात हे व्रत येते.

 

या व्रताच्या काळात पाच नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. *अहिंसा*, *सत्य*, *अस्तेय*, *अपरिग्रह*, *ब्रह्मचर्य* ही ती पाच तत्त्वे. शांततामय आयुष्य जगणे याला या व्रतात महत्त्व दिले गेले आहे. आंतरिक समृद्धी वाढवणे आणि आत्मविकास करणे हे उद्देश या व्रतात आहेत.

 

जैन संप्रदायांच्या दोन शाखा आहेत. १) *दिगंबर* २) *श्वेतांबर*. दिगंबर संप्रदाय हे व्रत दहा दिवस पाळतात आणि श्वेतांबर संप्रदाय हे व्रत आठ दिवस पाळतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत यथाशक्ती हे व्रत पाळले जाते. काही कट्टर जैन अन्न न घेता केवळ गरम पाणी प्राशन करतात. काही साधक साधुवेश धारण करून एखाद्या पवित्र स्थळी निवास करतात.

 

भगवान महावीर यांनी केलेल्या दहा उपदेशांचे स्मरण या दिवसात केले जाते. *तत्त्वार्थ सूत्र* हा ग्रंथ वाचला जातो. पर्युषण व्रताच्या शेवटच्या दिवशी कल्पसूत्राची मिरवणूक काढली जाते आणि पाचव्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते. अखेरच्या दिवसाला संवत्सरी असे म्हणतात.

 

*क्षमा हे वीरांचे भूषण आहे* असे भगवान महावीर सांगतात. क्षमा सर्व पापांना दूर करते व मोक्षाची वाट दाखवते. सर्वांची क्षमा मागणे याला या व्रतात विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या व्रत सांगतेच्या दिवशी सारे जैन धर्मीय परस्परांना *मिच्छामी दुक्कडम” असे म्हणतात. मिच्छामी म्हणजे क्षमा करणे, दुक्कडम याचा अर्थ चुकांशी संबंधित आहे. कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करावी ही विनंती या वाक्यात असते. थोडक्यात *क्षमापना* या भावनेला इथे महत्त्व आहे.

 

शुद्धात्म्याचे स्वरूप जाणण्याचेच हे पर्व आहे. शुद्धात्म्याची दहा लक्षणे आहेत. क्षमा, मार्दव, शौच, सत्व, संयम, तप, त्याग, अकिंचन्य व ब्रह्मचर्य ही आत्म्याची दहा लक्षणे.

 

या व्रतकाळामध्ये दहा दिवस एक एक धर्म पाळण्याचा भाविक कसोशीने प्रयत्न करतात. अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण असे हे व्रत आहे. माझ्या अनेक जैन मित्र मैत्रिणीं समवेत मी या व्रताचा अनुभव घेतलेला आहे. आत्मशुद्धीचे हे व्रत खरं म्हणजे कुणीही करावे. कुठेतरी या व्रताचे आणि आपल्या संक्रांत व्रताचे साधर्म्य मला जाणवते. *तिळगुळ घ्या आणि गोड बोला* आणि *मिच्छामी दुक्कडम्* यातून झालं गेलं विसरून आपण पुन्हा एक होऊया असाच संदेश मिळतो. क्षमेतून प्रेम आणि प्रेमातून आत्मशुद्धता असा सुंदर मानवी जीवनाचा प्रवास यात अभिप्रेत आहे.

 

*राधिका भांडारकर पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा