You are currently viewing कुडाळ- मालवण मधून निलेश राणेच हवेत ; भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह

कुडाळ- मालवण मधून निलेश राणेच हवेत ; भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह

अंतिम निर्णय मात्र पक्षाचा ; धोंडू चिंदरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

मालवण
भाजपा नेते दत्ता सामंत सामाजिक क्षेत्रात जोमाने कार्यरत असल्याने आमदार वैभव नाईक यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळेच हरी खोबरेकर असतील अथवा मंदार केणी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वैभव नाईक यांच्याकडून दत्ता सामंत यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे दत्ता सामंत यांनी स्वतः अनेक वेळा जाहीर केले आहे. त्यामुळे कुडाळ – मालवण मतदार संघाचा हक्काचा चेहरा म्हणून तळागाळातील कार्यकर्त्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निलेश राणेंच्या उमेदवारीची मागणी होऊ लागली आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा असून या मतदार संघातून येत्या निवडणुकीत कोणीही उमेदवार असला तरी त्याच्या विजयाचे शिल्पकार दत्ता सामंत असतील, असेही ते म्हणाले.

येथील भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत धोंडू चिंदरकर बोलत होते. यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, सभापती अजिंक्य पाताडे, महेश मांजरेकर, विक्रांत नाईक, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, भालचंद्र राऊत, सुमित सावंत, आबा हडकर, प्रमोद करलकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. चिंदरकर म्हणाले, दत्ता सामंत यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्या तोंडून स्वतः आमदार दत्ता सामंत यांच्यावर टीका करीत आहेत. दत्ता सामंत यांनी कोणतेही काम हाती घेतले की आमदार त्याचीच पुनरावृत्ती करतात. पण दत्ता सामंत यांनी स्वतः मला राजकारणात उतरायचं नाही, निवडणूक लढवायची नाही, हे स्पष्ट केलं आहे. तरीपण दत्ता सामंत यांची वैभव नाईकांना भीती का वाटतेय ? दत्ता सामंत हे स्वतःच्या खिशात हात घालून सामाजिक कार्य करतात. कोणा ठेकेदाराकडून पैसे घेऊन ते काम करत नाहीत. त्यामुळे दत्ता सामंत यांच्यावर टीका करणाऱ्यानी स्वतःची पात्रता ओळखावी. दत्ता सामंत याना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी शिवसेनकडून अनेकदा प्रयत्न झाले, त्यांना पैसा, पदांची आमिषे देण्यात आली, पण कुठल्याही आमिषाला बळी न पडता मी राणेसाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा