भालाफेकपटू नीरज चोप्राने जिंकलं ऐतिहासिक ‘गोल्ड मेडल’…
मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण, अॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील 125 वर्षांचा भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला.भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. २००८नंतर ( अभिनव बिंद्रा, नेमबाज) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.
नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. क्रमवारीनुसार त्याला दुसऱ्या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हाच्या अॅड्रीयन मार्डारे हा प्रथम भालाफेकीसाठी आला अन् त्यानं ८१.१६ मीटर लांब भालाफेक केली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करताना ८५.३० मीटर लांब भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं पहिल्या प्रयत्नात ८२.४० मीटर लांब भालाफेक केली. चेक रिपब्लिकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ८३.९८ मीटरचे अंतर गाठून पहिल्या फेरीअखेरीस टॉप फाईव्हमध्ये स्थान पक्के केले. नीरजनं अव्वल स्थान टिकवून ठेवले.
दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सहकारी अन् प्रशिक्षकांनी पदकाचा जल्लोष तेव्हाच सुरू केला. नीरजनं सेट केलेल्या लक्ष्याचा आसपासही प्रतिस्पर्धींना फिरकता आले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ज्युलियनला दुसऱ्या प्रयत्नात ७७.९० मीटर भाला फेकता आला. नीरजची भालाफेक पाहून प्रतिस्पर्धी दडपणात गेलेले दिसले. तिसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजला ७६.७९ मीटर लांब भालाफेकता आला. चेक प्रजासत्ताकच्या व्हितेझस्लॅव्ह व्हीसलीनं तिसऱ्या प्रयत्नांत ८५.४४ मीटर लांब भाला फेकून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानच्या नदीमनं ८४.६२ मीटर लांब भालाफेकून पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.
पहिल्या तीन प्रयत्नांनंतर १२पैकी ८ स्पर्धकच पदकाच्या शर्यतीत कायम राहिले आणि त्यात नीरज अव्वल स्थानावर व पाकिस्तानचा नदीम चौथ्या स्थानावर होता. आश्चर्याचा धक्का म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड धारक जर्मनीचा जॉहानेस वेटर हा बाद होणाऱ्या स्पर्धकांमध्ये होता. त्यानं दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नांत फाऊल केले. चौथ्या प्रयत्नात नीरजकडून फाऊल झाला. पण तरीही नीरज सुवर्णपदकाचा दावेदारच होता.
चेक प्रजासत्ताकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ५व्या प्रयत्नात ८६.६७ मीटर अंतर पार करून रौप्यपदकाच्या शर्यतीत धडक मारली. पाकिस्तानचा नदीम पाचव्या स्थानी घसरला. नीरजनं पाचव्या प्रयत्नातही फाऊल केला. पण नीरजला चिंता करण्याचं कारण नव्हतं. त्यानं पहिल्या दोन प्रयत्नात मारलेली मजल ही त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेशी होती. पाकिस्तानच्या नदीमला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, ८५.६२ मीटर ही त्याची फायनलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.