तात्काळ उपाययोजना करा, बांधकाम विभागाकडे मागणी…
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या इमारतीची अवस्था अत्यंत बिकट आहे. याबाबत तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी करण्यासंदर्भात उपायोजना करावी,अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण करू,असा इशारा येथील रक्तदाता संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दिव्या सूर्याजी,विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भाई देऊलकर, राघू चितारी, अनिकेत पाटणकर, वसंत सावंत आदी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील दरवाजे,खिडक्या यांची दुरावस्था झाली. येथील एसी बंद अवस्थेत आहेत. रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर अस्वस्थ वाटू लागते.यामुळे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे. तर ब्लड स्टोरेज रूममधील मशीनही बंद ठेवाव्या लागत आहे. यामुळे येत्या १५ ऑगस्टच्या आत ह्या समस्या सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत विभागामार्फत दुर न झाल्यास जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत ध्वजारोहणानंतर अधिकाऱ्यांना जाग्यावरून हलू दिल जाणार नाही,असा इशारा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून दिला आहे.
कोरोना काळात दिवसाला १० ते १५ बाटल्या रक्ताची आवश्यकता भासत आहे.लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन तातडीने दुरूस्ती करावी,अन्यथा तीव्र आंदोलना दरम्यान जी काही परिस्थिती उद्भवेल याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल,असा इशारा उपविभागीय अभियंता अनिल आवटी यांना श्री सुर्याजी यांनी दिला.
दरम्यान, श्री. आवटी यांनी तातडीनं याची दखल घेत डेप्युटी इलेक्ट्रीकल श्री. बंड यांना संपर्क साधत तातडीनं एसी दुरूस्तीचा सुचना दिल्या. यानंतर या टिमन उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीची पहाणी केली. तर दरवाजे, खिडक्या यांच्या सुधारणांबाबत तातडीनं उपाययोजना करणार असल्याची ग्वाही श्री आवटी यांनी दिली.