*मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे पद्मभूषण डॉ. धनंजय कीर उपपरिसर असे नामकरण*
रत्नागिरी :
जिल्हयातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ॲडव्हान्स कोर्सेस या उपकेंद्रात सुरु करण्यासाठी विद्यापीठाने प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ, एमआयडीसी, रत्नागिरी येथे रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठचे नामकरण चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर रत्नागिरी उपपरिसर म्हणून नामकरण व येथे लोकमान्य टिळक अध्यासन (अभ्यास व संशोधन) केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील,रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, विद्यापीठाचे कुलसचिव (प्र.) डॉ. बळीराम गायकवाड, चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर यांचे नातू डॉ. शिवदिप किर, लोकमान्य टिळक अध्यासन मुंबई विद्यापीठाच्या प्र. संचालिका सुचित्रा नाईक, रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठाचे प्र. संचालक डॉ. किशोर सुकटणकर, जयु भाटकर, प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर आदि मान्यवर उपस्थित होते.
सामंत म्हणाले चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर यांनी जे साहित्य लिहून ठेवल आहे, त्यांचे जे कार्य आहे ते रत्नागिरी जिल्हयामध्ये दिपस्तंभाप्रमाणे उभे राहीले पाहिजे यासाठी त्यांचे नाव उपकेंद्राला देण्याची मागणी सहा महिन्यात मान्य होऊन आजपासून रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ हे चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर रत्नागिरी उपपरिसर म्हणून ओळखला जाणार आहे.
निसर्ग वादळात जी विद्यालय बाधित झाली त्या आपद्ग्रस्त विद्यालयांना मदत करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील अध्यासन केंद्रानाही निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोकणामध्ये ज्या ठिकाणी पूर आला त्या ठिकाणच्या विद्यालय, शैक्षणिक संस्था यांना उभे करण्यासाठी विद्यापीठ निधी देण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.
सामंत म्हणाले रत्नागिरी जिल्हयामध्ये शासकीय इंजीनियरिंग कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेज च्या आवारात या वित्तीय वर्षापासून ते सुरु होत आहेत. याठिकाणी दोन कोर्सेस मर्जींग करुन इलेक्ट्रो-मॅकेनिक, सिव्हील-इन्फ्रास्ट्रक्चर आदि अशा प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात येत असून अशाप्रकारचे कोर्सेस सुरु करणारे हे महाराष्ट्रातील पहिल कॉलेज असणार आहे. तसेच कवी कालीदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्रही या वित्तीय वर्षामध्ये सुरु होते. शासकीय लॉ कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर व ग्रंथालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र , उर्दुभवन रिचर्स सेंटर आदि शैक्षणिक दालन रत्नागिरी येथे होत आहे. त्यामुळे रत्नागिरी हे शैक्षणिक हब होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही ते शिक्षण येथेच उपलब्ध होणार आहे.
*पुस्तक प्रकाशन*
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते लोकमान्य टिळक चरित्र या पुस्तकाचे तसेच गाईड फॉर नेटसेट युपीएससी ॲण्ड अदर एक्झामिनिशन इन इन्वहारमेंटल सर्व्हीस या पुस्तकांचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच या विद्यापीठातून एमएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड आणि लोकमान्य टिळक अध्यासन मुंबई विद्यापीठाच्या प्र. संचालिका सुचित्रा नाईक यांनी केले.
*लोकमान्य टिळक पुण्यतिथी अभिवादन*
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या 101 व्या पुण्यतिथी निमित्त टिळक स्मारक या लोकमान्यांच्या टिळक आळीतील निवासात मेघडंबरीतील पूर्णाकृती पुतळयास पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुरातत्व विभागाचे जतन सहाय्यक बालाजी बनसोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
सामंत यांनी लोकमान्य टिळक जन्मस्थानाला भेट देऊन येथील सर्व व्यवस्थेबाबत चर्चा केली. लोकमान्य टिळक जन्मस्थान अद्यावत करण्यासाठी निधी मंजूर झाली असून आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.