You are currently viewing गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्यांची अडवणूक तरुणाच्या जीवावर बेतली.

गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्यांची अडवणूक तरुणाच्या जीवावर बेतली.

कोरोनाच्या नावावर दोन्ही राज्यांच्या सीमेवर पर्यटकांची लूट

संपादकीय…..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच राज्यांमध्ये लॉक डाऊन झालं आणि नोकरी धंदे करणाऱ्या लोकांना घरात बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक हे नोकरीनिमित्त गोव्यात जातात. कित्येक तरुण गोव्यात राहूनच नोकरी,व्यवसाय करतात परंतु सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला आदी जवळपासच्या तालुक्यातील युवक हे दररोज आपल्या दुचाकीने गोव्यातून ये जा करतात आणि आपल्या नोकरीबरोबरच घरची शेतीवाडी देखील सांभाळतात. त्यामुळे रोज जा ये करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.
कोरोनाच्या वाढलेल्या प्रभावामुळे गोव्यात नोकरीस जाणाऱ्या वर्गाचे हाल झाले. दोन्ही राज्यांनी सीमा बंद केल्या होत्या, त्यामुळे आरटीपीसीआर टेस्ट करून नोकरीला जाणे शक्य नव्हते आणि नोकरीला न जाता जगणे सुद्धा शक्य नव्हते. कारण शिक्षणासाठी वगैरे घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थकीत राहत होते, बँका त्यामुळे मागे लागायच्या. मागच्या वर्षी केंद्र सरकारने लॉक डाऊन केल्याने बँकांच्या हफ्त्यांमध्ये सूट देण्यात आलेली जी यावेळी राज्यांनी लॉक डाऊन केल्याने दिली नाही. पर्यायी घर चालविण्यासाठी आणि कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी नोकरिशिवाय पर्याय उरला नव्हता. परिणामी अनेक नोकरदार तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गाळेल मार्गे चोरवाटेने गोवा गाठत होते. त्याच प्रयत्नात असलेला वेंगुर्ला येथील युवक गीतेश गावडे हा डोंगर खचून रस्त्यावर अचानक आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, आणि दोन्ही प्रशासनांनी केलेल्या सक्तीच्या तपासणीमुळे गीतेशला आपला प्राण गमवावा लागला. वेळ आणि काळ आला की काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय या घटनेच्यावेळी आला.
बांदा येथील हायवेवर गीतेश याची दुचाकी पंक्चर झाली, त्यामुळे त्याला जाण्यास वेळ लागला, आणि तिथेच काळाने त्याच्यावर घाला घातला. जर गाडी पंक्चर झाली नसती तर कदाचीत गीतेश डोंगर खचण्याच्या आधीच तिथून गेला असता, पण…..
अशी कितीतरी मुले आहेत जी त्या परिस्थितीत आपल्या घर कुटुंबासाठी पर्यायी चोरवाटेने का होईना गोव्यात धोका पत्करून जा ये करत होती. दोन्ही राज्यांच्या सरकारांनी नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांना नोकरीसाठी जरी थोडीफार सवलत दिली असती तरी अशाप्रकारे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला नसता. डोंगर खचने ही नैसर्गिक आपत्ती होती, परंतु नोकरदार तरुणांना सवलत देणे हे मात्र राज्य सरकारच्या हातात होते. एक निष्पाप जीव गेल्यानंतर आंदोलन होणार या भीतीने दोन्ही राज्य सरकारांनी नोकरीसाठी जा ये करण्यास सवलत दिली आहे, परंतु हिच गोष्ट जर अगोदर केली असती तर गीतेश गावडे वर जीव गमावण्याची आणि त्यांच्या कुटुंबियांवर आपला मुलगा गमावण्याची वेळ आली नसती.
कोरोनाच्या कालावधीत आरटीपीसीआर टेस्ट राज्याच्या सीमेवर सक्तीची केली गेली, परंतु गोव्यात जाणाऱ्या व गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांची मात्र दोन्ही सीमेवर पोलिसांकडून लूट होते. महाराष्ट्राच्या सीमेवर बांदा पोलीस रात्रीच्यावेळी स्वतः न जागता होमगार्ड लाठीवर ठेवतात. रात्रीच्यावेळी होमगार्ड गाड्या अडवण्याचे काम करतात. कोरोनाच्या कारणाने मात्र सर्वसामान्य पर्यटकांना विनाकारण भुर्दंड पडतो, अन्यथा टेस्ट करून जाण्याची सक्ती होते. टेस्ट पॉझिटिव्ह आली तर? या भीतीने बऱ्याचदा अर्थपूर्ण व्यवहार देखील होतात. त्यामुळे नोकरीनिमित्त रोजच ये जा करणाऱ्यांची मात्र कुचंबना होत होती. सरकारने अशाप्रकारे सुरू केलेल्या तपासणी नाक्यांवर काय चालते याची देखील तपासणी केली पाहिजे. अन्यथा सरकारकडून खबरदारी म्हणून सुरू केलेल्या उपायांमधूनच लोकांना त्रास होतो आणि त्यातून मार्ग काढताना गीतेशचा जसा निष्पाप बळी गेला तशा अप्रिय घटना घडतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा