You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि बेडची अनुपलब्धता…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि बेडची अनुपलब्धता…

सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी डॉक्टर सुरू करणार का कोविड सेंटर?

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी आजच जिल्हा रुग्णालयाला भेट देत जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली, चांगल्या सेवा सुविधा पुरविण्याबाबत सूचना केल्या. परंतु मुळातच जिथे कमी तिथे चांगल्या म्हणून अजून कुठून येणार? जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अतिरिक्त उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील दोन रुग्णालये अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
काहीच दिवसांपूर्वी कणकवलीतील डॉ.विद्याधर तायशेटे यांनी आपल्या खाजगी रुग्णालयात तळमजल्यावर ओपीडी सुरू ठेऊन पहिला मजला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर म्हणून सुरू करून जिल्ह्यातील इतर डॉक्टरांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कामी कणकवली व कसाल येथील काही डॉक्टर सुद्धा मदत करत आहेत. तसेच मालवण येथील डॉ.विवेक रेडकर यांचे हॉस्पिटल सुद्धा आजपासून कोविड सेंटर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी अधिग्रहित केलं आहे. जेणेकरून पैसा असूनही बेड मिळत नाहीत अशा रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील. त्यामुळे जिल्ह्यात असुविधांमुळे होणारे मृत्यू रोखले जातील.

डॉ.विद्याधर तायशेटे व डॉ.विवेक रेडकर यांचा आदर्श घेऊन इतर तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येत स्वतःचे खाजगी रुग्णालय सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड सेंटर करायची तयारी दाखवली पाहिजे तरच जिल्ह्यात अलीकडेच वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळणार आहे. कोरोनाच्या भीतीपोटी काही डॉक्टरांनी आपले दवाखाने सुद्धा बंद ठेवले आहेत, परंतु समाजाला जेव्हा आरोग्य सुविधांची गरज आहे त्यावेळी जनतेच्या जीवाचे रक्षक असणाऱ्या डॉक्टरांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झाला तेव्हापासूनच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना सेवा मिळत होती. अनेक खाजगी रुग्णालये येणारे रुग्ण नाकारत होते. अशावेळी राणी जानकीबाई संस्थेच्या रुग्णालयात सेवेतून निवृत्त होऊनही रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ.राजेशकुमार गुप्ता सारखे डॉक्टर अहोरात्र सेवा देत होते. आजही कोरोनाचा कहर वाढलेला असूनही डॉ.गुप्ता आर. जे. हॉस्पिटलमध्ये तसेच डॉ.सुमन नाईक यांच्या दवाखान्यात नियमित सेवा देतात, कोणताही रुग्ण असला तरी त्याला धीर देऊन योग्य प्रकारे उपचार करतात. त्यामुळे अनेक गोरगरीब रुग्णांसाठी डॉ.गुप्ता तारणहार ठरले आहेत. त्याचप्रमाणे राणी जानकीबाई संस्थेच्या रुग्णालयातील सपोर्ट स्टाफ देखील कोरोनाच्या काळात अतिशय चांगली रुग्ण सेवा देत होता.
एकीकडे मुंबईकर चाकरमानी गावी येत असताना विलगिकरण कक्ष कमी पडत होते तेव्हा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील हॉटेल्सना चाकरमान्यांना पेड कोरोन्टाईन ठेवण्याची सोय करण्यासाठी आवाहन केले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड सेंटर म्हणून अधिग्रहित करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा जिल्ह्यात वाढत असलेले रुग्ण पाहता, बेडची कमी हा विषय अतिशय त्रासदायक होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील डॉक्टरांनी देखील स्वखुशीने रुग्णसेवेसाठी पुढे येत सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + seven =