आभाळ फाटलं….राज्यात पावसाचा हाहाकार!!

आभाळ फाटलं….राज्यात पावसाचा हाहाकार!!

कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी भरले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाने गेले काही दिवस थैमान घातले असून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात पुलांवर पाणी आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

कुडाळ तालुक्यातील चेंदवन मळावाडी, वालावल, आंदुर्ले, बाव, पावशी शेलटेवाडी येथील लोकांना सुरक्षित स्थळी स्थानांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात पाण्याचा लोंढा अचानक वाढल्यास मदतकार्यात अडचणी येऊ शकतात म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून काही गावांमध्ये तशाप्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील ओरोस, पावशी, वेताळबांबर्डे, वागदे येथे महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे. वागदे येथे महामार्गावर तब्बल पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा आळवाडी येथे पाणी भरले असून बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.

कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुक नदीला पूर आल्याने खारेपाटण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. विजयदुर्ग खाडीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाढल्याने खारेपाटण जलमय झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या पुलांवर पाणी आले असून अनेक गावांचा संपर्क तुटला असून नुकतीच केलेली भातशेती देखील कुजण्याची तसेच वाहून जाण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चिपळूण मध्ये झालेल्या ढगफुटीने चिपळूनमध्ये हाहाकार उडाला आहे.

चिपळूण शहरात वशिष्ठी नदीच्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शहरात घुसले असून चिपळूण बसस्थानक येथे आठ ते दहाफुट पाणी भरले असून बाजारपेठ देखील पाण्याखाली आहे.

चिपळूनमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून नागरिकांनी इमारतींच्या टेरेसवर आसरा घेतला आहे.

अनेकजण पोटात अन्नाचा कण नसताना देखील आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे.

NDRF ची टीम चिपळूण शहरात दाखल झालेली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील खडवली येथील पुलावर पाणी आल्याने रस्त्याचा एक थरच वाहून गेला असून खडवली पुलाच्या खालून एक मृतदेह वाहून जात असताना दिसून आला आहे.

चिपळूण येथे महामार्गावर शेकडो वाहने पुराच्या पाण्यात अडकलेली दिसून येत असून काही वाहनांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वाहनांचे दिवे सुरू असल्याचे दिसत आहे.

पुरामुळे शेकडो वाहनांचे नुकसान झाले आहे, तसेच बाजारपेठेतील देखील दुकाने पाण्याखाली गेल्याचे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गेली काहिवर्षे जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, परंतु यावर्षी गेले आठ दहा दिवस कोकणात संततधार पाऊस सुरूच आहे, परंतु गेल्या दोन तीन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या बातम्या येत असून हवामान खात्याने अजून काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून जिल्हावासीयांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा