You are currently viewing कोल्हापुरात पावसाचं थैमान; NDRFची टीम रवाना, अनेक महामार्ग बंद

कोल्हापुरात पावसाचं थैमान; NDRFची टीम रवाना, अनेक महामार्ग बंद

कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात येत आहेत. पुण्याहून ही पथके निघाली असून दुपारपर्यंत दाखल होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं आहे. धुवाधार पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात संततधार सुरू आहे. राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . पंचगंगा नदीची पाणीपातळी आज सकाळी सात वाजता ३५ फूट होती. इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर पाहता आज सायंकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत या पथकांना कोल्हापुरात तैनात करण्याचे नियोजन केले होते. शासनाने आज पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक पथक कोल्हापुरात असेल तर दुसरे महापुराचा अधिक धोका असलेल्या शिरोळ तालुक्यात असेल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा