You are currently viewing शिवसेनेचे माजी वैभववाडी तालुकाप्रमुख बंडू मुंडल्ये यांचे निधन

शिवसेनेचे माजी वैभववाडी तालुकाप्रमुख बंडू मुंडल्ये यांचे निधन

राजकारणातील चाणक्य आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व हरपले

वैभववाडी

वैभववाडी तालुका शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ बंडू काका केशव मुंडल्ये (वय 60) यांचे सोमवारी सकाळी कणकवली येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. बंडु काका या नावाने ते परिचित होते. राजकारणातील चाणक्य नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने लढणाऱ्या काकांची तालुक्यातील राजकारणात एक वेगळीच ओळख होती.

नाम.नारायण राणे शिवसेनेत असताना तालुकाप्रमुख असलेल्या काकांनी आपल्या चाणाक्यनितीने अनेक निवडणुका जिंकल्या होत्या. राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते सुद्धा काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्या पक्षातही त्यांनी तालुका संघटक म्हणून यथस्वी काम केले. त्यानंतर काही वर्ष ते राजकारणापासून अलिप्त राहिले होते.जिल्ह्यातील राजकारणातील बदलानंतर त्यांनी राजन तेली यांच्या समवेत ते भाजपात गेले. त्याठिकाणी त्यांनी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. पुन्हा गेल्या दोन वर्षापासून ते शिवसेनेत सक्रीय झाले होते. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून किडणीचा आजार होता. रविवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार घेत असताना सोमवारी सकाळी ११.३० वा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा