You are currently viewing उद्योगपती नामदेव मराठे यांचे निधन

उद्योगपती नामदेव मराठे यांचे निधन

कणकवली

फोंडाघाटच्या माळरानावर कृषीनंदवन फुलविणारे उद्योगपती नामदेव राजाराम मराठे ( वय ६० ) यांचे मुंबई येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने अत्यंत दानशूर आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मागील काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. कणकवलीतील खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. मुंबईतील खासगी रुग्णलयात उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

घोणसरी गावचे सुपुत्र असलेले नामदेव मराठे यांनी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील आपला व्यवसाय सांभाळतानाच आपल्या मूळ गावी घोणसरी येथे येत ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाची स्थापना केली. दापोली कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषितंत्र पदविका विद्यालय, कृषी महाविद्यालय, ज्युनिअर विज्ञान कॉलेज, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ निगडित कॉलेज च्या माध्यमातून फोंडघाट दशक्रोशी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. धार्मिक, शैक्षणिक, सामजिक क्षेत्रात तर नामदेव मराठे यांची दानशूर व्यक्ती म्हणून ख्याती आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच घोणसरीसह फोंडाघाट दशक्रोशी आणि जिल्ह्यातही हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगा दीपेश, सून, मुलगी रचना असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा