You are currently viewing भावपूर्ण श्रद्धांजली!… सदाशिव रावजी उर्फ एस.आर. पाटील

भावपूर्ण श्रद्धांजली!… सदाशिव रावजी उर्फ एस.आर. पाटील

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी उर्फ एस.आर. पाटील यांचे निधन

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी उर्फ एस.आर. पाटील यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. भारतीय संघात खेळलेले ते एकमेव कोल्हापूरचे क्रिकेट खेळाडू होते. २०१७ मध्ये जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे.
रुईकर कॉलनी हिंद को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मैदानाजवळ त्यांचा बंगला होता. गेले काही दिवस ते आजारी होते. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. एस.आर.पाटील यांचा जन्म पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे १० ऑक्टोबर १९३३ मध्ये झाला. त्यांचे वडील सधन शेतकरी होते. आपल्या मुलांनी क्रिकेटमध्ये करियर करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार एस आर. पाटील आणि त्यांचे बंधू डी.आर. पाटील यांनी क्रिकेटमध्ये नाव कमावले. एस.आर.पाटील यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून छाप पाडली.
क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थस्टॅपोर्डशायर आणि नॅन्टविच या क्रिकेट क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजीत ठसा उमटवला. महाराष्ट्र रणजी संघात प्रतिनिधीत्व करताना त्यांनी भारतीय संघ निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. दोन डिसेंबर १९५५ मध्ये मुंबईत भारत आणि न्यूझिलंड या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली.
कर्णधार पॉली उम्रिगर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझिलंडचा धोकादायक खेळाडू जॉन रिड याला दोन्ही डावात बाद केले. भारतीय संघात निवड होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राकडून १९५२ ते १९६४ या कालावधीत खेळताना ३६ सामन्यात तीन अर्धशतकासह ८६६ धावा केल्या. तसेच ३०.६६ सरासरीने ८३ बळी मिळवले. ३८ धावात पाच बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
भारतीय संघाचे दरवाजे बंद झाल्यावरही त्यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळणे सुरू ठेवले होते. १९६२ मध्ये ते महाराष्ट्र संघाचे कर्णधार होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा