You are currently viewing ज्या पक्षात असेल त्या पक्षाला सुदिन आणणारा सुदन….

ज्या पक्षात असेल त्या पक्षाला सुदिन आणणारा सुदन….

आजचा दिवसही नेहमीप्रमाणे वाईट बातमी घेऊन आला. कुणाला स्वप्नातही वाटल नव्हत कि सुदन अशी अकाली एक्झिट घेईल. आपण ज्या राजकीय पक्षात असू त्या पक्षाशी आणि नेतृत्वाशी एकनिष्ठ राहून सतत पक्षसंघटनेसाठी काम करत रहायचे हा सुदनचा स्थायीभाव. जिल्ह्यात जेव्हा नारायणराव राणेंच आगमन झाल तेव्हापासून ते राणे कुटुंबियांशी एकनिष्ठ राहिले. पक्षाने आणि नेतृत्वाने दिलेला टास्क पूर्ण करायचा हे त्यांनी निश्चित केलेल असायचे.
निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप आले..दुष्मनी, राडे हे सर्वच योगायोगाने आपल्याला पहायला मिळत..इतरांचा अनुभव मला माहित नाही… पण निवडणूकीच्या काळातपण विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्याबरोबर.कसा सुसंवाद साधायचा हे मी अनुभवलय.आमचे मित्र प्रमोद जठार यांच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रचारासाठी मी कणकवलीत होतो.तेव्हा नितेश राणे काँग्रेसमधून लढत होते.कणकवलीत एका हाँटेलच्या समोर उभा होतो..सुदन देवगडच्या दिशेने जात होता. मला बघितल्यावर गाडी थांबवली..गाडीतून उतरला. म्हणाला, काय हवा कुणाची..?.चला चहा पिऊया..मी माझा ड्रायव्हर आणि सुदन चहा प्यायला गेलो..मला सांगा काय तुमचा अंदाज? मी म्हटल यावेळी जठार साहेबांसाठी ही निवडणूक खुपच कठीण आहे..आनंदाने मला मिठी मारली…म्हणाले तुमचा अंदाज आता नितेशजीना सांगतो…आणि ते आपल्या नियोजित दौऱ्यावर गेले.
सेनाभाजप युती असताना आणि नारायणराव सेनेत असताना निवडणूकीच्या काळात किंवा इतर पक्षीय कार्यक्रमात सुदनची भेट व्हायची. इतर पक्षातील कार्यकर्त्याचा तो नेहमीच आदर करत असे.
राजन तेली जि.प.चे अध्यक्ष असताना मी एकदा त्यांच्या केबिनमध्ये होतो. तिथ कार्यकर्त्यांची गर्दी होती. रिकामी खुर्ची नव्हती..सुदनच्या हे लक्षात आलं त्याने शिपायाला खुणावून माझ्यासाठी खुर्ची मागवली.
आठवणी खूप आहेत..माझी त्यांची शेवटची भेट सावंतवाडी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत झाली. विद्यमान नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रचाराची धुरा सुदनवर होती. मी तळ्याच्या काठावर बसलो होतो. सुदनने मला पाहिल आणि स्कूटर थांबवली..आम्ही पाच मिनिटं बोललो…मिस्कीलपणे हसून सुदन मला म्हणाला,”कणकवलीचो नितेशजींचो अंदाज खरो झालो…आता वाडीचा काय? मी सुदनला म्हणालो…ज्या निवडणुकीचो सूत्रधार सुदन मग विजय निश्चित…आणि आश्चर्य म्हणजे मतमोजणी दिवशी मी माझ्या एका मैत्रीणीच्या कामासाठी मालवण मसुरा येथील तलाठी कार्यालयात होतोल लसुदनने आठवणीने फोन करुन संजू निवडान ईलो..ही बातमी दिली.
सुदनच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेचं पण नारायणराव राणे आणि कुटूंबियांची फार मोठी वैयक्तिक हानी आहे..
कधी प्रवासात भेटल्यावर मुद्दाम थांबून हाक मारणारा, चौकशी करणारा, राजकीय चर्चा करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पक्षीय परिघाबाहेर जावून संबंध टिकवणारा सुदन परत कधीच भेटणार नाही…..
अटल आणि स्नेहप्रिया परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली
….अँड.नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eight =