You are currently viewing लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या भ्रष्ट कारभारावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईस वेळकाढूपणा होत असल्याने मनसे आक्रमक

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या भ्रष्ट कारभारावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईस वेळकाढूपणा होत असल्याने मनसे आक्रमक

येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास निद्रिस्त जिल्हा परिषद प्रशासनाला जागं करण्यासाठी 14 जुलै रोजी “घंटानाद”..!

“म्हातारी मेल्याचं दुःख नाही तर काळ सोकावता कामा नये” यासाठीच मनसेचे आंदोलन…कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसा हक्क लाभ प्रक्रियेत भ्रष्ट कारभार करत चुकीच्या पद्धतीने परजिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती दिल्याने मनसेने याबाबत माहे  मे 2020 रोजी विभागीय आयुक्त कोकण व मुख्य कार्यकारी अधिकारी,जि. प.सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. यामध्ये एकीकडे 2017 ते 2020 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक सफाई कामगारांचे वारस हे परजिल्ह्यातील उमेदवार दाखवून त्यांना बेकायदेशीरपणे नियुक्त्या देण्यात आल्या होत्या तर दुसरीकडे जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या खऱ्या खुऱ्या वारसांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले होते.मनसेच्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त स्तरावर चौकशीची प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून 5 मार्च 2021 रोजी मा.विभागीय आयुक्तांनी 15 दिवसांत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेशीत केलेले होते. मात्र सदरील भ्रष्ट कारभार प्रकरणी अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई होत नसल्याने जि.प. प्रशासन एकप्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे की काय असे वाटू लागले आहे. वास्तविक जिल्हा परिषद मधील  काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करत मनमानी पद्धतीने स्थानिक उमेदवारांवर अन्याय करून  “आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय” अशा पद्धतीने परजिल्ह्यातील उमेदवारांना नियम डावलून भरती केले तरी देखील जिल्हा परिषद प्रशासन कारवाईस चालढकल करीत आहे ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. या भ्रष्ट कारभारात जिल्हा परिषदेतील खरे एजंटरुपी सूत्रधार “वाझे” कोण आहेत  हे समोर येणे गरजेचे आहे.शिवाय देण्यात आलेल्या बेकायदेशीर नियुक्त्या तात्काळ रद्दपातल करणे अभिप्रेत असताना प्रत्यक्षात जिल्हा परिषद प्रशासन कारवाईस दिरंगाई करून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालीत आहे की काय अशी चर्चा आता जिल्हाभर रंगू लागली असून ती भूषणावह नक्कीच नाही. तरीही या प्रकरणी येत्या आठ दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास झोपलेल्या जिल्हा परिषद प्रशासनास जागं करण्यासाठी मनसेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेकडून दिलेल्या निवेदनात दिला आहे.

आता जिल्हा परिषदेची नियोजित सर्व साधारण सभा नेमकी 14 जुलै रोजीच असल्याने जिल्हा परिषद प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं याकडे उत्सुकता लागून राहिली आहे..?

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 10 =