गणेशोत्सवावरील निर्बंध उठवा, अन्यथा पालिका मुख्यालयासमोर करु महाआरती

गणेशोत्सवावरील निर्बंध उठवा, अन्यथा पालिका मुख्यालयासमोर करु महाआरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध शिथील करावेत. अन्यथा ठाण्यातील पालिका मुख्यालयासमोर महाआरती करुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात Ganesh Utsav 2021) नियमावली जारी करण्यात आली होती. त्यामध्ये गणेशमूर्तीच्या उंचीपासून अनेक गोष्टींवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या.

 

याच नियमावलीवर ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली. असं झालं नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठाणे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.

 

तसेच मूर्तीची उंची , देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबतही समनव्य समितीकडून सूचना मांडण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या नियमामध्ये शिथिलता द्यावी. असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे.

 

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना –

* गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.

* कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

*सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी.

*विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.

* नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.

* शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.

*सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

* आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.

*नागरिकांची गर्दी होऊ नये. या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

* गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

प्रतिक्रिया व्यक्त करा