You are currently viewing तरुणांनी शेतीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे – महेश संसारे

तरुणांनी शेतीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे – महेश संसारे

नाधवडे येथे पॉवर विडर दुरुस्ती कार्यशाळा संपन्न : लुपिन फाउंडेशन व प्रवण कंपनीचे आयोजन

वैभववाडी
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम लुपिन फाउंडेशन व प्रवण कंपनी करत आहे. शेतीची आवड असलेल्या तरुणांनी या क्षेत्रात स्वतःला झोकून देत प्रगती साधली पाहिजे. अनिश्चित पडणारा पाऊस यामुळे मोठ्याप्रमाणात शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. आधुनिक पद्धतीने शेती करत असताना शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये या उद्देशानेच ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. असे प्रतिपादन प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष महेश संसारे यांनी व्यक्त केले.

नाधवडे येथे लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग व प्रवण फार्मर प्रोड्युसर वैभववाडी यांच्यावतीने कृषी अवजारे दुरुस्ती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. लुपिन चे संस्थापक अध्यक्ष देश बंडु गुप्ता यांचा स्मृती दिन हा सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पहिल्या टप्प्यात पॉवर विडर या मशीनबाबतचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. या कार्यशाळेला तालुक्यातील 20 शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेला कणकवली येथील नामवंत मेस्त्री श्री. शेख यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. गावागावांमध्ये भात लावणीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पॉवर विडर खरेदी केले आहेत. त्या मशीनची किरकोळ दुरुस्ती साठी देखील शेतकऱ्यांना जादा रक्कम मोजावी लागते. तसेच वेळ वाया जातो.

शेतकऱ्यांना किरकोळ दुरुस्ती स्वत: करता यावी, या उद्देशानेच कार्यशाळा संपन्न झाली. तालुक्यात ही पहिलीच कार्यशाळा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लुपिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पेडणेकर, प्रवणचे संचालक राजेश तावडे, प्रशांत कुळये, नंदकुमार आमरसकर व शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =