पत्रादेवी महामार्गावरील फर्निचर शोरूमला भीषण आग, सर्व सामान जळून खाक

पत्रादेवी महामार्गावरील फर्निचर शोरूमला भीषण आग, सर्व सामान जळून खाक

बांदा

जुन्या पत्रादेवी महामार्गावरील बांदा प्राथमिक शाळेजवळील भूषण शिरसाट व प्रवीण शिरसाट यांच्या फर्निचर शोरूमला शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाले. माहिती मिळताच बांदा ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य केले. कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या साहाय्याने ही आग पुर्णपणे विझवण्यात यश आले.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

यावेळी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या दोन मुलांना सुभाष शिरोडकर यांनी धाडस दाखवत शिडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. बांदा प्राथमिक शाळेनजीक नजीक भूषण शिरसाट यांचा फर्निचरचा शोरूम आहे.तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचे बंधू प्रवीण शिरसाट यांचे निवासस्थान आहे.आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या शोरूममध्ये असलेल्या सोफा सेटवर आगीची ठिणगी पडली.आणि क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीसाठी पुढे सरसावले.मात्र भीषण आग लागल्याने या आगीत शोरूमधील सर्व सामान जळून खाक झाले.आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.मात्र आतमध्ये धूर असल्याने आग विझवताना मर्यादा येत होत्या.अखेर कुडाळ येथील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचा बंब बोलावण्यात आल्यानंतर सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनी ही आग पुर्णपणे विझवण्यात यश आले.

या शोरूमच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे प्रवीण शिरसाट यांची दोन मुले अडकून पडली होती.अखेर ग्रामस्थांच्या सहकार्याने सुभाष शिरोडकर यांनी धाडस दाखवत शिडीवरून आपल्या खांद्यावरून या दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.मदतकार्यात बांदा ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले यावेळी बांदा पोलीस सुद्धा घटनास्थळी हजर होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा