जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह भाजपा शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांशी चर्चेतून मागणी
शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील पेट्रोल पंपावर सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात दोन लिटर आणि भाजपा सदस्य असलेल्याना कार्ड दाखवून एक लिटर अशा उपक्रमाची जाहिरातबाजी केली. शिवसेनेचा वर्धापनदिन होता, तर आजच्या आरोग्याच्या परिस्थितीत कितीतरी चांगले कार्यक्रम किंवा उपक्रम राबवता आले असते. जिल्हात कोरोना बळींची संख्या हजाराचा आकडा गाठत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला उकसावत वातावरण बिघडवण्याची काहीही गरज नव्हती. पण आमदार वैभव नाईक यांनी मुद्दाम राणे यांचा पेट्रोलपंप असलेल्या ठिकाणी येऊन वातावरण बिघडवले. याठिकाणी भाजप-शिवसेना वाद निर्माण केला आणि दुर्दैवी बाब म्हणजे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना आमदार नाईक यांनी धक्काबुक्की केली. याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत आणि काही वृत्तवाहिन्यानी ते बातमीसह प्रसिद्ध केले आहेत.
याप्रकरणी आता सिंधुदुर्ग भाजपा आक्रमक झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राजेंद्र दाभाडे यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्येही मी संघर्षासाठीच राणेंच्या पेट्रोल पंपावर घुसलो असल्याचे म्हणत घडल्या प्रकाराची कबुली दिली आहे, तसेच यापूर्वीही पोलीस अधीक्षकांशी रस्त्यावर उतरून लढल्याचे महाराष्ट्राने पाहिल्याचे सांगत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. या सगळ्याची सखोल चौकशी करून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे कटकारस्थान करणाऱ्या आणि पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण जाणीवपूर्वक संघर्ष करायला पेट्रोल पंपावर आल्याचे वैभव नाईक यांच्या प्रेसनोटवरून सिद्ध होत आहे, त्यामुळे या विषयात भाजपा कार्यकर्त्यांना दोषी मानून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येणार नाही. पोलिसांनी सत्तेच्या दबावाखाली न येता योग्य पद्धतीने कारवाई करून आमदार वैभव नाईक यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि आपल्या दलातील दबावाखाली आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली. अन्यथा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखला जाण्यासाठी भाजपा सिंधुदुर्गतर्फे जिल्ह्यात उग्र आंदोलन उभारण्यात येईल असे या शिष्टमंडळाने स्पष्ट केले. या शिष्टमंडळात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, ज्येष्ठ पदाधिकारी गुरुनाथ उर्फ राजू राऊळ, युवा मोर्चाचे श्रीपाद उर्फ पप्या तवटे आणि जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष अविनाश पराडकर यांचा समावेश होता.