कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या 50 खाटांच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचे लोकार्पण

कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या 50 खाटांच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचे लोकार्पण

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोना हद्दपार होऊ शकतो – खासदार शरद पवार

सिंधुदुर्गनगरी

एका मोठ्या संकटाचा सामान आपण सर्वजण करतो आहोत. एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून याच्यावर मात करू शकतो आणि कोरोना हद्दपार होऊ शकतो, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी आज व्यक्त केला.

      येथील जिल्हा समादेशक कार्यालय इमारतीमध्ये कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या निधीतून 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे. याचे लोकार्पण खासदार श्री पवार यांच्या हस्ते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन करण्यात आले.

      खासदार श्री. पवार पुढे म्हणाले, 1 जूनला राज्य शासनाकडे या केंद्राचा प्रस्ताव आला आणि आज त्याचे लोकार्पण होत आहे. यातून प्रशासनाची गतीमानता दिसून येते. राज्यावर ज्या ज्या वेळी संकट आली त्या त्या वेळी ती परतवून लावण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सिजन उत्पादक घटक, शासन, प्रशासन, असे सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आपल्या सर्वांच्या अशा सामुदायिक प्रयत्नाने कोरोनाचे हे संकटदेखील गेल्या शिवाय राहणार नाही. निश्चितपणे प्रयत्न करून यातून बाहेर पडू असा, विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

      गृहनिर्माण मंत्री श्री आव्हाड म्हणाले, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सुविधा पोहचली पाहिजे हा संदेश घेऊन आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. पक्ष बाजूला ठेऊन कोरोनाशी लढा द्यायचा आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी हा लढा लढायचा आहे. शासन आपल्या सोबत आहे.

      पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पहिल्या लाटेत जिल्ह्याला सुस्थितीत ठेवण्यात यशस्वी झालो होतो. पक्ष विरहित आम्ही सर्वजण जिल्ह्यासाठी काम करतोय. या आजच्या कार्यक्रमात सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. आता सुद्धा जिल्हा कोरोना मुक्त होईल. चक्राकार पद्धतीने पदभरती झाली तर जिल्ह्याला डॉक्टरांची कमतरता भासणार नाही.

      जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनीही यावेळी सविस्तर माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी स्वागत केले. तसेच अमित सामंत यांनी प्रास्ताविक करून कोविड सेंटरच्या उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सर्वांचे आभार मानले.

      या कार्यक्रमावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा