You are currently viewing जिल्ह्यात दाखल झालेल्या टास्कफोर्सच्या डॉक्टरांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

जिल्ह्यात दाखल झालेल्या टास्कफोर्सच्या डॉक्टरांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

ओरोस जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत केली चर्चा

राज्याच्या टास्क फोर्स अंतर्गत बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील ४ तज्ञ डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज ओरोस जिल्हा रुग्णालय येथे आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या, रुग्णांवर औषधोपचाराच्या नियोजना संदर्भात चर्चा केली. टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी जिल्ह्याच्या स्थितीचा आढावा घेत जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारासंदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोविड साथरोगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार टास्क फोर्स अंतर्गत बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील ४ तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी आजपासून जिल्हयात सेवा बजावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवस कोविड रुग्णांवर उपचारासाठी पूर्ण वेळ सेवा बजावणार असल्याचे टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.त्याचबरोबर त्यांना कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटर मधील रुग्णांवर देखील उपचार करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी विनंती केली.


यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, पुणे मेडिकल कॉलेज औषधवैद्यकशास्त्र विषयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. आनंद कापडिया, सहाय्यक प्राध्यापक डॉ. गिरीष कदम, कनिष्ठ निवासी-२ डॉ. विक्रम हाटेकर, व कनिष्ठ निवासी-२ डॉ. सुदीप परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =