वैभववाडीतील जेष्ठ प्राथमिक शिक्षक विजय माने यांचे निधन

वैभववाडीतील जेष्ठ प्राथमिक शिक्षक विजय माने यांचे निधन

वैभववाडी :

सडुरे चव्हाणवाडी विद्या मंदिर प्रशालेचे प्राथमिक शिक्षक विजय संग्राम माने वय 55 यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने वैभववाडी येथे निधन झाले. मयत विजय माने यांचे मुळगाव चाकूर, जिल्हा लातूर आहे. सन 2012 पासून ते वैभववाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. गेली अनेक वर्ष त्यांनी शिराळे प्रशालेत काम केले होते. शांत, संयमी व उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची तालुक्यात ओळख होती. सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. दरम्यान येथील खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वैभववाडीचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृतदेह शिक्षकांच्या ताब्यात दिला. त्यांच्यावर चाकूर, जिल्हा लातूर येथील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा