कणकवली तालुक्‍यातील कोरोना हॉटस्पॉट २६ गावांमध्ये चाचण्या वाढवा…

कणकवली तालुक्‍यातील कोरोना हॉटस्पॉट २६ गावांमध्ये चाचण्या वाढवा…

प्रांताधिकारी वैशाली राजमाने ; तालुकास्तरीय टास्कफोर्सची बैठक…

कणकवली

तालुक्यात चार हजार कोरोना बाधित आहेत. तर २६ गावातील काही वाड्‍या कोरोना हॉटस्पॉट ठरल्‍या आहेत. या वाड्यांतील प्रत्‍येक नागरिकांची कोरोना टेस्ट होण्याच्या दृष्‍टीने चाचण्या वाढवा असे निर्देश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आज दिले.
कणकवली तालुकास्तरीय टास्क फोर्सची बैठक तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार नगरपंचायतचे प्रतिनिधी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

तालुक्‍यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सद्यस्थितीत हॉटस्पॉट ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येत असून येथील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपले कुटुंब,आपली वाडी, गाव कोरोना मुक्त करूया असे आवाहन राजमाने यांनी केले आहे. तालुक्यात कलमठ, लिंगेश्वर, ओसरगाव, नांदगाव, खारेपाटण दक्षिण बाजार, जानवली, खारेपाटण संभाजीनगर, तोंडवली, तळेरे फोंडाघाट, वागदे, कसवण, तरंदळे, ओझरम्, डांमरे, वरवडे, चिंचवली, फोंडा गाव, पियाळी, दारूम, कासरल, कासार्डे, करूळ, फोंडा उत्तर बाजार, घोनसरी आदीं २६ गावे अथवा वाड्यांमध्ये मिळून ३८४१ सक्रिय रुग्ण सोमवार पर्यंत होते. तर शहरांमध्ये बाजार पेठ, शिवाजीनगर, विद्यानगर टेंबवाडी परबवाडी, जळकेवाडी, मधलीवाडी या ठिकाणी मिळून ९९ सक्रिय रुग्ण होते. या प्रत्येक भागात दहा किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण असल्याने हा भाग किंवा संबंधित गावांमधील वाडी हॉटस्पॉट मध्ये येते. दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या ठिकाणी गावांमध्ये किंवा वाड्यांमध्ये टेस्टिंग वाढविण्यात येणार आहे, आरोग्य विभागाला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून या वाड्या-वस्त्या मधील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या भागातील ४५ वर्षावरील नागरिकानी लसीकरण करून घ्यावे. प्रत्येकाने सामाजिक अंतर राखणे मास्कचा वापर आणि सॅनिटायझर चा वापर करणे या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा. येथील लोकांनी अत्यावश्यक काम वगळता ही साखळी तोडण्यासाठी काही दिवस घरी थांबणे इतरांमध्ये न मिसळणे अत्यावश्यक आहे. याबाबतची बंधने काही दिवसांसाठी पाळली तर तालुक्यातील हॉटस्पॉट कमी होतील. त्यासाठीचे सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. तरी सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे यातून आपण कुटुंब, वाडी, गाव कोरोना मुक्त करूया, असे आवाहन राजमाने यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा