You are currently viewing आरोग्याचा आपला हक्क आपणच मिळवण्यासाठी आंदोलन! जनतेसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल!!

आरोग्याचा आपला हक्क आपणच मिळवण्यासाठी आंदोलन! जनतेसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल!!

भाजपा युवा नेते आनंद शिरवलकर आरोग्य प्रश्नी आक्रमक! सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडण्याचा दिला जाहीर इशारा

कुडाळ तालुका हा जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असूनही आरोग्याच्या नावाने सगळी बोंबाबोंबच आहे. भाजपा नेते मा.नारायणराव राणेसाहेबांच्या प्रयत्नातून कुडाळचे महिला हॉस्पिटल उभे राहिले. उभे राहिलेले हे हॉस्पिटल शिवसेनेची सत्ता असूनही व्यवस्थित सुरू करायलाही आमदार वैभव नाईक यांना जमले नाही. आता कोविड सेंटरच्या निमित्ताने का होईना, हॉस्पिटल चालु झाले आहे. त्यातच सुधारणा करत ते अद्ययावत करायचे सोडून ते बंद करून कोरोनारुग्णांना ओरोसला शिफ्ट करायचा घाट नेमका कोण घालतो आहे? जिल्हाधिकारी यांनी हे कोअर सेंटर हलविण्यास “स्थगिती” दिली असे वृत्तवाहिन्या म्हणत आहेत. “स्थगिती” दिली याचा अर्थ निर्णय झाला होता, हे उघड होते. आता सगळेच जर कानावर हात ठेवून “विश्वामित्री पावित्रा” घेऊन स्थगिती मिळवल्याचे श्रेय घेत आहेत, तर मग ते हलवण्याचा निर्णय कोणाचा होता हे पण जनतेला कळले पाहिजे. फक्त टक्केवारीसाठी कुडाळच्या आरोग्याशी खेळणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांना खेचून जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलन करावे लागले तरी पाठी हटणार नाही. जनतेचे आरोग्य हा कोणाचाही खोरे लावून पैसा कमावण्याचा धंदा अजिबात व्हायला देणार नाही. ज्यांनी जनतेची काळजी घ्यायला हवी, ते लोकप्रतिनिधी कुडाळमध्ये एका डॉक्टरच्या नावे तोंडदेखली पार्टनरशिप करून जनतेला आर्थिकदृष्ट्या अक्षरश: तलवार लावून कापायचे धंदे करत आहेत. हे तलवारीचे शौक आता थांबवा, जनतेला संकटकाळात आधार द्यायच्या नैतिक कर्तव्याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आंदोलन करून गुन्हे घ्यायची वेळ आमच्यावर येते हे दुर्दैव! पण जनतेसाठी कितीही गुन्हे लादलात तरी ते झेलू, प्रसंगी तुरुंगात जाऊ, पण यापुढे आरोग्य विषयात “खोटी कर्मे” करणाऱ्या सगळ्यांचाच बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर उघडा करणारच, असा खरमरीत इशारा भाजपाचे युवा नेते आनंद शिरवलकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा