सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीत होणार फेरबदल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीत होणार फेरबदल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा होणार दौरा.

संपादकीय…..

राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या सात वर्षात जिल्ह्यात वाताहात झाली, एकवेळ जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला नगरपालिका सहित अनेक जिल्हापरिषद, पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद होती. परंतु केसरकरांच्या राष्ट्रवादीतील एक्झीट नंतर आणि संदेश पारकरांच्या पक्षत्यागाने राष्ट्रवादी खिळखिळी झाली ती आजपर्यंत पुन्हा सत्तेत आली नाही. केसरकरांच्या पक्षत्यागानंतर पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे यांना अजित पवारांनी जिल्ह्यात पाठवले. विविध सामाजिक उपक्रमांनी तिने राष्ट्रवादीला उभारी दिली. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश गवस चांगले काम करत होते. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे राष्ट्रवादीची धुरा जितेंद्र आव्हाड यांच्या शिफारशीमुळे अमित सामंत यांच्याकडे दिली गेली. राष्ट्रवादीला पुन्हा उभरते दिवस येण्याची चिन्हे दिसू लागली. परंतु अमित सामंत यांची कार्यपद्धती वेगळी आहे ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रुचत नाही. त्यामुळे वरिष्ठांची ताकद मिळूनही राष्ट्रवादी म्हणावी तशी वाढली नाही. उलट उभारी घेत असलेल्या राष्ट्रवादीची लिंक तुटली. जोमात काम करणारे सुरेश गवस, उदय भोसले शांत झाले आणि अर्चना घारे पुण्याकडे रवाना झाल्या.
जुलै महिन्यात शरद पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा होत आहे, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीची प्रदेशची टीम येणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे. या दौऱ्यात वेंगुर्ल्यातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते एम.के.गावडे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली जाणार असून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर यांनाही संधी दिली जाणार आहे. बबन साळगावकर हे सावंतवाडीतील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आहेत. राजकारणाचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. पक्षाध्यक्षांनी बबन साळगावकर यांना ताकद दिली पाहिजे, तरंच सावंतवाडीत राष्ट्रवादी उभारी घेईल.
जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्ह्यासाठी १००% फळबाग अनुदान योजना दिल्यामुळे जिल्ह्यातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. शरद पवारांचे देखील जिल्ह्यावर खूप प्रेम आहे. आजही शरद पवार हे जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नावाने ओळखतात. त्यामुळे जिल्ह्याचे आणि पवारांचे घनिष्ठ नाते आहे. मध्यंतरीच्या काळात माजी मंत्री प्रविण भोसले, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर आणि सुरेश दळवी यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी खिळखिळी झाली होती. परंतु राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री झाली आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना हुरूप आला तिथूनच राष्ट्रवादी राज्यात आणि जिल्ह्यात वाढताना दिसून आली. याच संधीचा फायदा घेत सिंधुदुर्गात नव्या जोमाने राष्ट्रवादीला उभारी मिळण्यासाठी स्वतः पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार लक्ष घालण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात राष्ट्रवादी पक्षाची जडणघडण करण्यासाठी होणारा शरद पवारांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा लक्षवेधी ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा