You are currently viewing शिवछत्रपतींच्या अपमानापुढे भाडभीड नाही! माफी मागावीच लागेल! मार्गीसारखी प्यादी वापरून गावाची बदनामी करू नका!

शिवछत्रपतींच्या अपमानापुढे भाडभीड नाही! माफी मागावीच लागेल! मार्गीसारखी प्यादी वापरून गावाची बदनामी करू नका!

अतुल बंगेना शिवश्री रत्नाकर जोशी यांचा निर्णायक इशारा

शिवराज्याभिषेक दिन साजरा करणे फक्त शासकीय औपचारिकता वाटणे, हेच या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे दुर्दैव छत्रपतींच्या अभेद्य जलदुर्गाचे नाव धारण केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हुमरमळा वालावल गावाच्या नशिबी आले आहे. महाराष्ट्रभर गावाची बदनामी केलेल्या अतुल बंगे यांना चुकीची जाण करून देण्याऐवजी माजी सरपंच मार्गी हे गाव बंगेंच्या पाठीशी असल्याचे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? पायात बूट घालत झेंड्याचे पूजन करत शिवछत्रपतींचा अपमान करणारे अतुल बंगे आणि स्वार्थासाठी त्यांची तळी उचलत पाठराखण करणारे माजी सरपंच प्रवीण मार्गी हे दोघेही हुमरमळा-वालावल गावची निर्लज्जपणे बदनामी करत आहेत. शिवछत्रपतींचा अपमान होताना गाव पाठीशी राहील म्हणणे ही गावाच्या अस्मितेची बदनामी आहे. स्वतःच्या क्षणिक फायद्यासाठी प्रवीण मार्गी यांनी गावकऱ्यांच्या अस्मितेला वेठीस धरू नये. गेल्या वर्षीपर्यंत आपल्यावर अतुल बंगेनी अन्याय करत आपले राजकारण संपवले म्हणत गावभर टाहो फोडणारे हेच का ते मार्गी, जे आता अतुल बंगे यांच्या राजकीय कारभाराभोवती दिवे ओवाळत आहेत? ही कसली जादू आहे, हे गावकऱ्यांना समजते. त्यामुळे गावाला उकसावत स्वार्थाचे राजकारण खेळणे मार्गी यांनी बंद करावे, असा रोखठोक सल्ला मराठा चळवळीतले कार्यकर्ते शिवश्री रत्नाकर जोशी यांनी दिला आहे.

मुळातच हा मराठा विरुद्ध अन्य समाज असाही विषय नाही, किंवा कोणत्याही दोन पक्षाच्या राजकारणाचाही नाही. फक्त आपला इगो जपण्यासाठी अतुल बंगे यांनी गैरसमज पसरवत सामाजिक वातावरण गढूळ करू नये. चुकीची माफी त्यांनी समाज आणि पक्ष म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मागावयाची आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल ती मागावी एवढीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेल्या जनसामान्यांच्या मनातील आदरापेक्षा अतुल बंगे यांचा वैयक्तिक इगो मोठा नसावा. मराठा किंवा अन्य समाजाच्या राजकारणाचा हा विषय नसून जात किंवा पक्ष कोणताही असो, हा त्या शिवप्रेमींच्या श्रद्धेचा अपमान आहे. आपण केलेल्या या कर्माचे प्रायश्चित्त म्हणून मनोमन शिवप्रेमींची माफी मागण्यापेक्षा हे महाभाग आपण आपल्या केलेल्या चुकीच्या समर्थनासाठी सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. अशा चुकीच्या प्रवृत्तीला आजच जागच्या जागी रोखलं नाही, तर उद्या हे असेच कित्येक मार्गी समोर आणून उभे करतील आणि छत्रपतींचा अपमान पचवु पाहतील. स्वराज्याच्या या भूमीत छत्रपतींचा अपमान होत असताना आणि त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त न करण्याचा माजोरडेपणा दिसत असताना शिवप्रेमी गप्प राहणार नाहीत. आपल्या राजाच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी जर भाडभिड न बाळगता आपण एकत्र येणार नसलो, तर आपल्या शिवप्रेमाला तो कलंक असेल. म्हणून समोर कोणीही असो, अशा निर्लज्ज वृत्तीचा आणि दळभद्री स्वार्थासाठी धिक्कार आणि निषेधच समाजातून झाला पाहिजे. हुमरमळा-वालावल ग्रामस्थही बंगे-मार्गी जोडगोळीच्या पापात कदापि सामील होणार नाहीत. अतुल बंगेनी माफी मागून विषय थांबवावा, नाहक सामाजिक वातावरण कलुषित करू नये, असा इशारा रत्नाकर जोशी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 15 =