You are currently viewing मिरग

मिरग

मिरग ….. सूर्य जून महिन्याच्या साधारणतः ७ किव्हा ८ तारखेला मृग नक्षत्रात प्रवेश करतो आणि तिथूनच मृगाचा म्हणजेच मिरगाचा पाऊस सुरू होतो. मृग नक्षत्र हे अवकाशातील अतिशय देखणं नक्षत्र मानलं जातं. अवकाशातील मृग नक्षत्राचा आकार हा मृग म्हणजे हरिणासारखा असतो, कदाचित त्यामुळेच त्याला मृग नक्षत्र असे नाव पडले असेल.
मृगाचा सुरुवातीस होणारी मेघ गर्जना आणि विजांचा लखलखाट जणू काय शेतकऱ्यांना आपल्या शेतात उतरून लढण्याची प्रेरणा देत असावा. शेतकरी मिरगाच्या पूर्वी शेतीची अवजारे, फाळ, नांगर इत्यादी बाहेर काढून साफसफाई, दुरुस्ती करून शेतीची तयारी करून ठेवतो. परशुरामाच्या या कोंकण भूमीला “भाजल्याशिवाय पिकणार नाही” असा शाप आहे, त्यामुळेच भात पेरणीच्या अगोदर व पावसाळ्यापूर्वी जमीन पातेरा, शेण पसरून भाजून घेतात व पाऊस सुरू होताच नांगरणी करून तरवा पेरतात. आजकाल शेती परवडत नाही तरीही मृग नक्षत्राच्या सुरुवातीस शेतकरी मात्र पिकाची पेरणी करून सोन्याचे दाणे पिकविण्यास सज्ज होतो. काही ठिकाणी पाऊस चांगला होण्यासाठी शेतात पर्जन्यराजासाठी नैवेद्य ठेवण्याची देखील प्रथा आहे.
कोकणात मृग नक्षत्र म्हणजे मिरग हा मात्र घरोघरी वर्षभर जपून ठेवलेला घराचा कोंबडा कापून साजरा केला जायचा. आजकाल नेहमीच घरटी कोंबड्याचे मटण असते, परंतु पूर्वी कोंबडा कापायचा म्हणजे त्यासाठी विशिष्ठ कारण असायचे. मिरग हे त्यातीलच एक महत्त्वाचे कारण. मिरगाला पावसाची सुरुवात, वातावरणात येणारा थंडावा आणि त्या थंडाव्यात गरम गरम गावठी कोंबड्याचा रस्सा म्हणजे पर्वणीच असायची. घराच्या कौलांच्या फटीतून धूर दूर दूर पसरतो आणि मटणाचा वास वाऱ्याबरोबर नाकातोंडात घुसतो. न्हाणीत भाजलेल्या काजू आणि फणसाच्या हटळ्या (बिया) फोडून खाण्याची मजा देखील तेव्हाच येते जेव्हा मिरगाचा पाऊस सुरू होतो.
मिरगाच्या सुरुवातीस लाल रंगाचा मिरग किडा दृष्टीस पडतो, हा किडा दिसला की मिरग जवळ आल्याची चाहूल लागायची. पाऊस येणार याची आणखी एकजण कल्पना द्यायचा तो म्हणजे बेडूक. डराव डराव आवाज करत बेडूक पावसाच्या आगमनाची जणू काय आरोळी देतात. पहिल्या पावसाच्या आधीच पेरलेल्या तवशी, दोडकी, पडवळचे कोंब फुटलेले वेल हळूहळू ढाकांवर चढतात, अळवाच्या मुंडल्यांना अंकुर फुटतात, रानावनात हिरवळ दाटते आणि सर्वसृष्टी जणूकाय नव्या पर्वाच्या स्वागतासाठी सज्ज होते. शेतकरी राजाला खुश पाहून आकाशात ढग हसतो आणि वाजतगाजत, रोषणाईच्या झगमगाटात मिरगाच्या पावसाचे आगमन होते, मागचं पुढचं सर्वकाही विसरून शेतकरी राजा शेतीच्या कामाला लागतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 3 =