41 वर्षीय कोरोना मुक्त रुग्णाच्या भावना
सिंधुदुर्गनगरी
मधुमेह, उच्च रक्तदाब, त्यातच कोरोनाची लागन. यामुळे माझी प्रकृती बरीच खालावली होती. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सनी योग्य उपचार करत मला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. अशी भावना कोळंब, ता. मालवण येथील 41 वर्षीय कोरोना मुक्त रुग्णाने व्यक्त केली आहे.
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली. तपासणीत ते पॉजिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. 11 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. आज ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील आपल्या अनुभवा विषयी बोलताना ते म्हणाले, रुग्णालयात दाखल झालो त्यावेळी ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. एचआरसीटीचा स्कोअर साडे सतरा इतका होता. त्यातच मधुमेह आणि उच्चरक्तदाब असे दोन्ही आजार. त्यामुळे प्रकृती बिघडली होती. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी माझी चांगली काळजी घेतली. आम्हाला दोन वेळा वेळेवर जेवण, काढा, अंडी दिले जात होते. मध्यरात्री सुद्धा वॉर्डमधील नर्स दक्ष असत. मध्यरात्री सुद्धा ताप, रक्तदाब यांची तपासणी केली जात होती. मधुमेह असल्याने आहाराचे नियोजन केले होते. वेळेवर औषध दिली जात होती. डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपचारांमुळेच मी मृत्यूच्या दाढेतून परतलो आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत.