समाजामध्ये जनजागृती होण्याकरीता मार्गदर्शक यंत्रणा व संपर्क केंद्र कार्यान्वीत करा…
मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदूर्ग :
जिल्ह्यात म्युकर मायकोसिस, ब्लॅक फंगस व व्हाईट फंगस सदृश्य आजाराचे रुग्ण जिल्ह्यात सापडण्यास सुरुवात झालेली असून या तीनही आजारावर पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये म्युकर मायकोसिस हा आजार उद्भवल्यास एका रुग्णाला किमान ८ ते ८.५० लाख रुपये खर्च येणे अपेक्षीत असून तो सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे यावरील उपचार शासकीय दवाखान्यात किंवा शासनमान्य स्वयंसेवी संस्थेकडे होणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना आजाराने मृत्यु पावलेला जिल्हयातील आकडा भयभीत करणारा ठरला आहे .त्यामुळे म्युकर मायकोसिस आजार उपचाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात यावा व हा आजार साथरोग म्हणून घोषित करण्यात यावा अशी मनसेची मागणी आहे. कोविड-१९ सह हे आजार असलेल्या रुग्णांची संख्या व मृत्युसंख्या घटविणे करीता रुग्णभरती , रुग्णोपचार याबाबत समिक्षा होणेसाठी जिल्हास्तरावर वैद्यकिय तज्ञ समिती गठीत व्हावी व या समितीमार्फत नागरीकांमध्ये जनजागृती व प्रबोधन आवश्यक मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे. सदरचे मार्गदर्शन नागरिकांसाठी दूरध्वनिद्वारे उपलब्ध व्हावे यासाठी आपले स्तरावरून प्रबोधन व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी अशी आमची आग्रही मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.
ब्लॅक फंगस या आजाराची राज्यात जवळपास १५०० रुग्णसंख्या असून २९ मृत्यु झाल्याचे अधिकृत वृत्त आहे . या दोन्ही प्रकारचे आजारांवर औषधांचा तुटवडा असून अभाव देखील आहे . या आजाराचा प्रार्दुभाव होण्याच्या कारणामध्ये वैद्यकिय तज्ञांमध्ये मताभिन्नता असून समाज घटकांमध्ये आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर अज्ञान असल्याने जिल्ह्यात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजामध्ये जनजागृती होण्याकरीता मार्गदर्शक यंत्रणा व दूरध्वनी संपर्क केंद्र कार्यान्वीत होणे काळाची गरज असल्याने भविष्यातील परिस्थितीचे गांभीर्यपूर्वक अवलोकन करून ग्रामपंचायत ते नगरपंचायत/नगरपालिका स्तरापर्यंत जनतेमध्ये आजारांची जनजागृती होवून प्राथमिक उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्रीम.के मंजूलक्ष्मी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.