You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पॉझिटिव्हीटी रेटमध्ये महाराष्ट्रात टॉपला हे पार्सल पालकमंत्र्यांचे अपयश!

सिंधुदुर्ग जिल्हा पॉझिटिव्हीटी रेटमध्ये महाराष्ट्रात टॉपला हे पार्सल पालकमंत्र्यांचे अपयश!

मुख्यमंत्र्यांचा खेळ झाला पण जनतेचा जीव गेला? उघड्यावर पडलेल्या कुटुंबांची कोणाची जबाबदारी??

भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांचा संतप्त सवाल

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा पत्ता कट करण्याच्या राजकारणापायी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद “तुला नको मला, दे रत्नागिरीला” करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजकीय मांड घट्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातही परत उदय सामंत यांची मुळे जास्त खोलवर रुजू नये यासाठी रत्नागिरीत न फिरकता मुंबईतच बसणारा पालकमंत्री आणून रत्नागिरीच्या डोक्यावर लादला. मुख्यमंत्र्यांच्या या सत्तेच्या खेळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा सत्यानाश झाला. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा २१.३६ टक्के असा महाराष्ट्रात सर्वोच्च असून, त्याखाली रत्नागिरी जिल्हा १९.२२ टक्केसह महाराष्ट्रात तिसरा आहे. निसर्ग आणि पर्यावरणसमृद्ध असलेल्या या निरोगी जिल्ह्याचे स्मशान बनवण्याचे अभूतपूर्व काम शिवसेनेच्या गटबाजीच्या राजकारणाने “करून दाखवलं” आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही हे खरे असले, तरी तुमच्या राजकारणापायी जिल्ह्याची वाट लागली त्यावर कधी बोलायचं, हे तरी सांगा.

आज या दोन्ही जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याने कसलेच निर्बंध हटवले जाणार नाहीत. कोकणातील ऐन धंद्याचा घरात बसून घालवावा लागला, आता पावसात काय हरिनाम सप्ताह करून त्यावर जगायचे का, असा संतप्त सवाल पराडकर यांनी व्यक्त केला आहे.

कोविडमध्ये जनता धडाधड बळी पडतेय, पण उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत. पार्सल पालकमंत्री उदय सामंत यांना प्रशासन हाताळण्यात पूर्ण अपयश आले आहे. खासदार विनायक राऊत हे २००० डॉक्टरांची मोट बांधण्याची वल्गना केल्यापासून जे अदृश्य झाले आहेत, त्यांना शोधण्यासाठी आता एखादे डॉक्टरांचे पथक उद्धव ठाकरेंनी पाठवावे. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर त्यांना सहकार्य न करण्याचे कोणाचेतरी छुपे आदेश असल्यासारखी स्थिती स्पष्टपणे जाणवतेय. जनता मेली तरी चालेल, पण आपले राजकारण साधायचे आणि वर दुसऱ्यांना राजकारण न करण्याचे तत्वज्ञानाचे डोस घ्यायचे असे उफराटे प्रकार चालले आहेत.

वैद्यकीय यंत्रणा जर थकली तर पुढे काय याचे उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नाही. जिल्हा कोविड हॉस्पिटलवर प्रचंड ताण आहे. आता गावागावात कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण करण्यासाठी शाळेत भरती करून ठेवले जात आहे, तर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टर व नर्सना जिल्हा रुग्णालयात वळते करण्याचा घाट प्रशासन घालत आहे. गावात डॉक्टर आणि परिचारिका नसतील तर गावातल्या शाळेत रुग्णांना जमवून काय “सरस्वती पूजनाचा कार्यक्रम” करायचा आहे का? जनता मरतेय, त्याच्या उपचारापासून ते अंत्यविधीपर्यन्त लुटमार होऊन मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यात सत्ताकेंद्रे व्यस्त आहेत, आणि पालकमंत्री निरो दोन्ही जिल्ह्यात फिडल वाजवतोय असे दुर्दैवी चित्र आहे. अजूनही पालकमंत्र्यांनी सद्सद्विवेकबुद्धीला जागत आज फक्त पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे कढवण्यासाठी जो गावागावात कोविड केअर सेंटरचा तमाशा चाललाय, तो वेळीच थांबवावा. कोरोना कसा आणि का पसरतो हे सगळ्या सेंटरमधली स्थिती पाहिली तर सहज लक्षात येईल. पोलीस यंत्रणा वापरून सामान्य माणसांशी दंडुकेशाही करून कोरोनाबळी थांबणार नाहीत. आधी अपयश मान्य करत नियोजन आणि आरोग्यव्यवस्था सुधारा आणि मग जनतेला शिस्तीचे धडे द्या. तुमच्या सत्तेच्या खेळात जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि शेकडो नागरिकांचा मृत्यू झालाय. आता इथल्या उध्वस्त कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारून घ्या, असा उपरोधीक सल्लाही अविनाश पराडकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + twenty =