You are currently viewing प्रा. प्रविण बांदेकर यांची साहित्य आणि संस्कृती मंडळावर नियुक्ती

प्रा. प्रविण बांदेकर यांची साहित्य आणि संस्कृती मंडळावर नियुक्ती

संपादकीय…

सावंतवाडीचे सुपुत्र नामवंत लेखक चाळेगतकार प्रा. प्रविण बांदेकर यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळावर शासनाने नियुक्ती केली. प्रा.प्रविण बांदेकर हे कोकणातील नामवंत लेखक , त्यांची चाळेगत ही गाजलेली कादंबरी…
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती समितीमध्ये राज्यातील एकूण तीस नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक, यांचा समावेश असतो. प्रख्यात साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे या समितीचे मान्यवर अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २७ मे रोजी प्रसिद्ध केला असून या तीस जणांच्या समितीमध्ये कोकणातील नामवंत लेखक प्रा.प्रविण बांदेकर यांची सदस्यपदी निवड केली आहे.
प्रा. बांदेकर यांनी कादंबरी सोबतच कविता, ललित, बालसाहित्य देखील लिहिले आहे. चिंटू बुळबुले हे बालसाहित्य १९९६ मध्ये प्रसिद्ध झाले, तसेच त्यांची २००० साली येरु म्हणे, २००५ साली खेळखंडोबाच्या नावाने या कविता प्रसिध्द झाल्या आहेत. २००९ साली त्यांची गाजलेली कादंबरी चाळेगत प्रकाशित झाली होती. घुंगुरकाठी हे ललित साहित्य २००९ मध्ये तसेच उजव्या सोंडेच्या बाहुल्या हे २०१६ मध्ये प्रसिध्द झाले आहे. २०१९ साली प्रा. बांदेकर यांचे शोषण मूलक तथाकथित संस्कृती वाहकाना आव्हान देणारी “इंडियन एनिमल फार्म” ही कादंबरी लिहिली. प्रा. बांदेकरांच्या या कादंबरीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
नेहमीच वेगवेगळ्या अंगाचे लिखाण करणारे प्रा.प्रविण बांदेकर हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. तसेच सावंतवाडीत प्रसिद्ध होणाऱ्या वैनतेय साप्ताहिकाची धुरा देखील ते वाहत आहेत. सावंतवाडीतील सुपुत्र असलेल्या प्रा.बांदेकर यांच्या निवडीमुळे साहित्यिक वर्गातून त्यांचे विशेष कौतुक होत असून विविध मान्यवरांकडून, शैक्षणिक आणि समाजातील विविध घटकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रा.बांदेकर यांच्यासह राज्यभरातील नामवंत लेखकांचा या समितीमध्ये समावेश असून त्यात डॉ.नागनाथ कोतापल्ले, फ.मु.शिंदे, डॉ.दया पवार, जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =